महाविकास आघाडी एकत्र लढणार;मनसेलाही सोबत घेण्याची तयारी; ‘आप’ १२८ जागा स्वतंत्र लढवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 15:46 IST2025-12-16T15:44:51+5:302025-12-16T15:46:00+5:30
शहरातील सत्तासमीकरणे आणि विरोधकांची रणनीती लक्षात घेता आघाडी अधिक व्यापक करण्यावर भर दिला जात आहे.

महाविकास आघाडी एकत्र लढणार;मनसेलाही सोबत घेण्याची तयारी; ‘आप’ १२८ जागा स्वतंत्र लढवणार
पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने एकत्रित लढण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धवसेना) आणि काँग्रेस हे आघाडीतील प्रमुख तीन पक्ष आगामी महापालिका निवडणूक संयुक्तपणे लढवणार असल्याचे सांगितले आहे. शहरातील सत्तासमीकरणे आणि विरोधकांची रणनीती लक्षात घेता आघाडी अधिक व्यापक करण्यावर भर दिला जात आहे.
महाविकास आघाडी संघटनात्मक बांधणी, संयुक्त प्रचार आणि समन्वय यावर विशेष लक्ष केंद्रित करणार असून, सत्ताधाऱ्यांना सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याच अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही (मनसे) सोबत घेऊन निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे आघाडीतील नेत्यांनी स्पष्ट केले आहे. मनसेसोबत आघाडी झाल्यास शहरी मतदारांमध्ये प्रभाव वाढेल, असा राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर, महाविकास आघाडीतील घटक व समविचारी पक्ष एकत्र येण्यास तयार असल्यास त्यांनाही आघाडीत सामावून घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, आम आदमी पक्षाने (आप) महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय जाहीर केला असून, शहरातील सर्व १२८ जागांवर उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. ‘आप’कडून स्वतंत्र लढत दिली जाणार असल्याने निवडणुकीत तिरंगी किंवा बहुरंगी लढती होण्याची शक्यता आहे.
तिन्ही प्रमुख पक्षांची अंतिम बैठक लवकरच
महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांच्या शहराध्यक्षांची अंतिम बैठक लवकरच होणार आहे. या बैठकीत प्रभागनिहाय आढावा, मागील निवडणुकांचे निकाल, स्थानिक समीकरणे आणि ताकद लक्षात घेऊन जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला निश्चित केला जाणार आहे. जागावाटपाबाबत लवचिक धोरण ठेवत, जिंकण्याची क्षमता आणि स्थानिक नेतृत्वाला प्राधान्य देण्यावर भर दिला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.