- रवींद्र जगधने
पिंपरी : राज्यभरातील तरुणांना खाकीचे आकर्षण असल्याने पिंपरी-चिंचवडपोलिस दलातील भरतीसाठी तगडी स्पर्धा सुरू आहे. पुणे जिल्ह्यासह विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातून शेतकरी, मजूर, चालक, पेंटर अशी पालकांची पार्श्वभूमी असलेले तरुण भोसरीतील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात मैदानी चाचणीसाठी हजर झाले आहेत. घरची परिस्थिती सुधारण्यासाठी, आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि सरकारी नोकरीची स्थिरता मिळवण्यासाठी ते जीव ओतून प्रयत्न करत आहेत.
पिंपरी-चिंचवडपोलिस दलात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत काही प्रवर्गात जास्त जागा उपलब्ध असल्याने आणि काही प्रवर्गात कमी स्पर्धा असल्याने अनेक उमेदवारांनी येथे प्राधान्य दिले आहे. अनेकांनी अकॅडमीत प्रशिक्षण घेतले असले तरी बहुतांश तरुणांनी घरीच कष्ट करून सराव केला आहे. काहींनी यापूर्वी दोन ते सहावेळा भरतीसाठी परीक्षा दिल्या असून, आता यश मिळवण्याचा त्यांचा निर्धार आहे. हे तरुण फक्त नोकरीसाठी नव्हे तर स्वप्नांसाठी आणि कुटुंबासाठी लढत आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिस भरतीतून यश मिळेल, अशी त्यांना अपेक्षा आहे.
तरुणांचे अनुभव
वडील खासगी प्रवासी वाहनावर चालक आहेत. बारावीनंतर पोलिस भरतीचा सराव सुरू केला. चार महिन्यांपासून घरीच मेहनत घेतली आहे. खाकी वर्दी घालून घरची आर्थिक परिस्थिती सुधारावी आणि आई-वडिलांना सुख द्यावे, हाच उद्देश आहे. येथे येऊन चांगली संधी मिळाली आहे. - जमीर शेख, रा. हाळी, ता. वीर, जि. लातूर
वडील पेंटर आहेत. बारावीनंतर मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेतले. सहा महिन्यांपासून सराव सुरू आहे. इडब्ल्यूएस प्रवर्गात जागा जास्त असल्याने पिंपरी-चिंचवडची निवड केली. सरकारी नोकरी मिळाली तर कुटुंबाला आधार मिळेल, असा विश्वास आहे. - अरबाज पठाण, रा. हडरगुळी, उदगीर, लातूर
बी.ए. पूर्ण केले आहे. वडील तीन एकर शेती करतात. माझी ही तिसरी भरती आहे. खाकीचे आकर्षण आणि घरची जबाबदारी सांभाळण्यासाठी मेहनत घेत आहे. यश मिळेल, असा आत्मविश्वास आहे. - सागर घोडके, रा. निमणी, ता. तासगाव, जि. सांगली
वडील शेती करतात. माझी ही दुसरी भरती आहे. यापूर्वी अमरावतीत गेलो होतो. येथे राहण्याची चांगली सुविधा आहे. त्यामुळे जास्त चांगले वाटते. कुटुंबासाठी स्थिर नोकरी हवी आहे. - बाबासाहेब लोंढे, रा. पाचुंदा, नेवासा
बारावीनंतर भरतीचा सराव सुरू केला. ही तिसरी भरती आहे. वडील शेती करतात. घरीच कष्ट करून तयारी केली. खाकी वर्दी घालून समाजसेवा करायची आणि घरची परिस्थिती बदलायची इच्छा आहे. - दीपक सोनवणे, रा. वाशिम
माझी ही पाचवी भरती आहे. मागील वेळी मुंबईतील भरतीत ‘वेटिंग’मध्ये होतो. आता वय संपत आहे. ही शेवटची संधी आहे. पण यश मिळेल याचा ठाम विश्वास आहे. कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी खूप मेहनत घेतली आहे. - गुरुप्रसाद चव्हाण, सोलापूर
बी.ए. पूर्ण केले असून, वडील शेती करतात. व्हीजेएनटी प्रवर्गात अकोल्यात फक्त एक जागा होती; पण पिंपरी-चिंचवडमध्ये पाच जागा असल्याने येथे आलो. सराव चांगला केला आहे. यशस्वी होऊन खाकीचा मान राखेन. - अमित राठोड, रा. अकोला
Web Summary : Pimpri-Chinchwad police recruitment sees tough competition. Youths with farming, labor backgrounds strive for stability, family support. Many prepared at home, aiming to fulfill dreams, secure government jobs. They seek to improve their lives and honor their families.
Web Summary : पिंपरी-चिंचवड पुलिस भर्ती में कड़ी प्रतिस्पर्धा है। खेती, श्रम पृष्ठभूमि वाले युवा स्थिरता और पारिवारिक समर्थन के लिए प्रयास करते हैं। कई लोगों ने घर पर तैयारी की, उनका लक्ष्य सपने को पूरा करना और सरकारी नौकरी हासिल करना है। वे अपने जीवन को बेहतर बनाने और अपने परिवारों का सम्मान करने की कोशिश करते हैं।