ऐकावे ते नवलच; निळ्या रेषेमध्ये चिखलीमध्ये बुलडोझर फिरविला
By विश्वास मोरे | Updated: May 23, 2025 16:47 IST2025-05-23T16:46:13+5:302025-05-23T16:47:51+5:30
निळ्या पूररेषेच्या आत बांधकाम करण्यास सक्त मनाई आहे. सुधारित विकास आराखड्यात पूररेषांची आखणी जलसंपदा विभागाने तयार केलेल्या काटछेद नकाशानुसारच केला असल्याचा दावा आहे.

ऐकावे ते नवलच; निळ्या रेषेमध्ये चिखलीमध्ये बुलडोझर फिरविला
पिंपरी : उद्योगनगरीचा प्रारूप विकास आराखडा जाहीर होण्यापूर्वी चिखलीतील निळ्या रेषेतील ३९ बंगल्यावर महापालिकेने बुलडोझर फिरविला. तर दुसरीकडे पिंपळे सौदागर, रहाटणीत निळी रेषाच वळवली असल्याचे उघड झाले आहे. यातून राजकीय नेते, अधिकारी, प्रशासन आणि बांधकाम व्यावसायिकांची अर्थपूर्ण अळीमिळी दिसून येत आहे. याबाबत पर्यावरणवादी संघटना यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पिंपरी- चिंचवड शहरातून पतना, इंद्रायणी, मुळा या तीन नद्या वाहतात. त्या नद्यांसाठी जलसंपदा विभागाने नद्यांच्या पूररेषेचे काटछेद नकाशे तयार केले होते. त्यानुसार २५ वर्षात येणारा पूर दर्शविणारी निळी पूररेषा आणि १०० वर्षात येणारा पूर दर्शविणारी लाल पूररेषेची आखणी केली आहे. निळ्या पूररेषेच्या आत बांधकाम करण्यास सक्त मनाई आहे. सुधारित विकास आराखड्यात पूररेषांची आखणी जलसंपदा विभागाने तयार केलेल्या काटछेद नकाशानुसारच केला असल्याचा दावा आहे. मात्र, त्यात बदल झाला आहे, असे उघड झाले आहे. रहाटणीत सरळ असणारी निळी रेषा सर्व्हे सर्वे क्रमांक १०२ मधून ते ९७ कडे सरळ गेली आहे. ही रेष सर्वे नंबर १०२ पासून १०१ मधून वळवून सर्व्हे नंबर ९५, ९७ आणि ९९ मधून वळवली आहे. या रेषा नक्की कोणासाठी बदलल्या? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान नद्यामध्ये मोठ्या प्रमाणत भराव टाकण्यात येत आहे. त्याबाबत पर्यावरण संघटनेकडून महापालिका प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्याकडे महापालिका प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे, अशी तक्रार पर्यावरणवादी संघटनेमधून होत आहे. भराव टाकणाऱ्यांवर प्रशासनाने वेळीच कारवाई करण्याची आवश्यकता होती, त्यामुळे नदीपात्र अरुंद झाले नसते, असेही संघटनेचे मत आहे.
उपअभित्यांने तयार केला बनावट नकाशा
पवना नदीची पूररेषा निश्चित करणारा एकच नकाशा पुण्याच्या पाटबंधारे विभागाने दिला असताना, काही वर्षांपूर्वी एका उपअभियंत्याने बनावट नकाशा तयार केल्याचे उघड झाले होते. ज्यामुळे एकाच क्षेत्रासाठी दोन भिन्न नकाशे तयार होऊन पूररेषेत तफावत आढळून आली होती. नवीन घोळाविषयी एक बाब उघड झाली आहे.
आराखड्यापूर्वी नद्यांच्या निळ्या व लाल रेषा निश्चिती करण्याबाबत एक बैठक झाली होती, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. त्यावेळी काही गावांची निळ्या व लाल रेषा उपलब्ध असणारे नकाशे मिळाले नाहीत, सद्यस्थिती सद्यस्थितीची पाहणी करून नकाशा प्रस्तावित केला आहे.
धनदांडग्या व्यक्तींच्या हितासाठी आराखडा
धनदांडग्या आणि प्रभावशाली व्यक्तींच्या हितासाठी आरखडा तयार केला आहे. प्रशासनातील अधिकारी, बिल्डर आणि राजकीय नेते एकत्र येऊन सामान्य जनतेला कसे लुबाडतात, याची उदाहरणे समोर आली आहेत, अशी टिका नागरिकांमधून होत आहे. संबधितावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
येथील रेषाच वळविली
पवनानदी किवळेपासून दापोडीपर्यंत आहे. जलसंपदा विभागाच्या नकाशानुसार पिंपळे सौदागर येथील सर्व्हे क्रमांक १८२ येथे या सर्वेक्षणातील सुमारे ८० टक्के क्षेत्र नदी ते निळी पूररेषा क्षेत्रात येत असल्याचे जुन्या नकाशात आहे. मात्र आता, हे क्षेत्र वगळून ते निळ्या पूररेषेबाहेर दाखवले आहे. त्याचबरोबर रहाटणी इथंही असाच प्रकार झाला झाला आहे. निळ्या रेषेचा मार्गच बदलल्याचे उघड झाले. याबाबत सूज्ञ नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
पिंपळे सौदागर येथील पवना नदीच्या पूररेषेत धनदांडग्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी हेराफेरी केली आहे. महापालिकेच्या भ्रष्ट आणि गलथान कारभाराची सखोल चौकशी करून तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा. - सीमा सावळे, माजी अध्यक्ष, स्थायी समिती
नद्यांमध्ये अनेक वर्षांपासून भराव टाकण्यात येत आहेत. त्यामुळे नद्यांचे क्षेत्र अरुंद होत आहे. याविषयी अनेकदा तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अनेक ठिकाणी पूर रेषेबाबत आक्षेप आहेत. पूररेषेबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. - धनंजय शेडबाळे, पर्यावरणवादी