गांजा बाळगल्याप्रकरणी महिलेला पाच वर्षांची शिक्षा; अमली पदार्थ विरोधी पथकाने केली होती कारवाई
By नारायण बडगुजर | Updated: March 9, 2025 13:05 IST2025-03-09T13:03:51+5:302025-03-09T13:05:44+5:30
न्यायलयाने नंदा बोत्रे हिला ५ वर्षे सक्त मजुरी व ५० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे

गांजा बाळगल्याप्रकरणी महिलेला पाच वर्षांची शिक्षा; अमली पदार्थ विरोधी पथकाने केली होती कारवाई
पिंपरी : गांजा बाळगल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल केला. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली. या महिलेला खेड न्यायालयाने ५ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला.
नंदा विलास बोत्रे (५४, रा. खालुंब्रे, ता. खेड, जि. पुणे), असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे २) बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक विक्रम गायकवाड यांचे पथक तयार केले. पथक म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर होते.
संशयित महिला नंदा बोत्रे हिच्याकडे गांजा असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने कारवाई करून नंदा बोत्रे या महिलेकडून एक लाख ९० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यामध्ये ३ किलो ८१० ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी संशयित महिलेच्या विरोधात म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८६/२०२४ एनडीपीएस ॲक्ट कलम ८(क), २०(ब) (ii) (ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष जायभाये यांनी केला होता.
याप्रकरणाची सुनावणी खेड अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. ए. घानीवाल यांच्याकडे चालू होती. अंमली पदार्थ विरोधी पथकातर्फे सुनावणी करीता पाठपुरावा करण्यात येत होता. यात ५ मार्च रोजी न्यायलयाने नंदा बोत्रे हिला ५ वर्षे सक्त मजुरी व ५० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त विशाल हिरे, बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील, सहायक निरीक्षक विक्रम गायकवाड, उपनिरीक्षक संतोष जायभाये, राजन महाडीक, पोलिस अंमलदार प्रदीप शेलार, राजेंद्र बांबळे, मितेश यादव, सदानंद रुद्राक्षे, सूर्यकांत पवार यांच्या पथकाने ही कामगिरी केली.