पिंपरी : शहराला भामा आसखेड धरणातूनपाणीपुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या जलवाहिनीच्या कामाची गती कमी आहे. चार वर्षांची मुदत संपली, तरी काम अपूर्णच आहे. केवळ ४८ टक्के झाले असल्याने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी ठेकेदार आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ठेकेदाराची झाडाझडती घेत तुम्हाला काळ्या यादीत का टाकू नये, असा इशारा त्यांनी दिला आहे.पिंपरी-चिंचवड शहरासाठी भामा आसखेड धरणात १६७ एमएलडी पाण्याचा कोटा राखीव करण्यात आला आहे. यासाठी पाणीपुरवठा विभागाने २०२० मध्ये निविदा प्रक्रिया राबवून जलवाहिनी टाकण्याचे काम ऑफशोअर इंडिया या ठेकेदाराला दिले. नवलाख उंबरेपासून चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्यात येत आहे. जलवाहिनीचे संपूर्ण काम १६२ कोटी रुपयांचे आहे. काम सुरू करण्याचा आदेश १५ डिसेंबर २०२० रोजी दिला होता. कामाची मुदत १५ डिसेंबर २०२४ अशी चार वर्षांची होती. मात्र, या मुदतीत १९ किलोमीटरपैकी केवळ नऊ किलोमीटर जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे.सोमवारी (दि. १६) जलवाहिनीचा ठेकेदार आणि पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे, सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी, प्रभारी कार्यकारी अभियंता दीपक पाटील, सल्लागार आदी अधिकाऱ्यांसमवेत अतिरिक्त आयुक्त जांभळे-पाटील यांनी बैठक घेतली. कामाच्या संथ गतीवरून नाराजी व्यक्त करीत ठेकेदाराची झाडाझडती घेतली. कामासाठी दिलेली चार वर्षांची मुदत संपली आहे, त्यामुळे तुम्हाला काळ्या यादीत का टाकू नये, असा इशारा दिला. आंद्रा धरणाच्या कामाला अद्याप प्रारंभ नाहीदरम्यान, आंद्रा धरणातील पाणी नवलाख उंबरे येथून एकाच जलवाहिनीतून चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्यात येणार आहे. या मार्गात साडेसात किलोमीटर जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. मात्र, या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. सध्या इंद्रायणी नदीतून निघोजे बंधाऱ्यातून महापालिका ८० एमएलडी पाणी उचलत आहे.
भामा आसखेड जलवाहिनीच्या ठेकेदाराची झाडाझडती; काळ्या यादीत का टाकू नये? : महापालिकेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 16:04 IST