पिंपरी-चिंचवड : उघड्यावर आढळली 2 दिवसांची जन्मलेली नकोशी, मुलीला हॉस्पिटलमध्ये केले दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 19:35 IST2018-02-07T19:35:47+5:302018-02-07T19:35:51+5:30
मारुंजी (मुळशी) येथील एका हॉटेलच्या मागील मोकळ्या मैदानात उघड्यावर संध्याकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास नुकतीच जन्मलेली मुलगी सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पिंपरी-चिंचवड : उघड्यावर आढळली 2 दिवसांची जन्मलेली नकोशी, मुलीला हॉस्पिटलमध्ये केले दाखल
पिंपरी-चिंचवड (वाकड) : मारुंजी (मुळशी) येथील एका हॉटेलच्या मागील मोकळ्या मैदानात उघड्यावर संध्याकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास नुकतीच जन्मलेली मुलगी सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही मुलगी केवळ दोन दिवसांची असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मारुंजी रस्त्यावरील हॉटेलमागील परिसरात शेती व मोकळे मैदान आहे. येथेच उघड्यावर या नकोशीला निदर्यी लोकांनी टाकून पळ काढला. भर उन्हात मैदानातून लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येत असल्यानं येथील रहिवासी असलेल्या रवी यांनी पाहणी केली असता ही घटना उघडकीस आली. यानंतर त्यांनी नियंत्रण कक्षाला संपर्क साधला.
यानंतर हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीला ताब्यात घेतले व उपचारासाठी औंध जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक गवारी यांनी सांगितले.