सावधान..! एका क्लिकमुळे बँक खाते होईल रिकामे;‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’साठी असुरक्षित नोंदणी

By नारायण बडगुजर | Updated: March 26, 2025 12:17 IST2025-03-26T12:16:41+5:302025-03-26T12:17:13+5:30

शासनाच्या अधिकृत वेबसाइटशी साधर्म्य असलेली वेबसाइट बनवून सायबर गुन्हेगारांकडून घातला जातोय गंडा

pimparichinchwad news Beware Bank account will be empty with one click; Unsafe registration for ‘High Security Number Plate | सावधान..! एका क्लिकमुळे बँक खाते होईल रिकामे;‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’साठी असुरक्षित नोंदणी

सावधान..! एका क्लिकमुळे बँक खाते होईल रिकामे;‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’साठी असुरक्षित नोंदणी

पिंपरी : वाहनांसाठी ‘हाय सिक्युरिटी रजिस्टर्ड प्लेट’ (एचएसआरपी) बसवणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे वाहनधारक प्लेटसाठी ऑनलाइन नोंदणी करतात. ही बाब हेरून सायबर गुन्हेगारांकडून बनावट वेबसाइटवरून वाहनधारकांची फसवणूक करण्याचा नवा फंडा अवलंबला जात आहे. त्यामुळे ‘एचएसआरपी’ नोंदणी करताना वाहनधारकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (एचएसआरपी) नोंदणीसाठी शासनाने https://transport.maharashtra.gov.inही अधिकृत वेबसाइट उपलब्ध केली आहे. मात्र, सायबर गुन्हेगार या वेबसाइटशी साधर्म्य असलेली वेबसाइट तयार करून फसवणूक करतात. या वेबसाइटची लिंक सोशल मीडियावर शेअर करतात. ‘लिंकवर क्लिक करा आणि घरबसल्या मिळवा एचएसआरपी नंबरप्लेट’, असे आमिष दाखवणारे मेसेज आणि बनावट वेबसाइटची लिंक व्हाटस्ॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि विविध वेबसाइटवर दिली जाते.


 
मुदतवाढ सायबर गुन्हेगारांच्या पथ्यावर

सन २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या राज्यातील जवळपास दोन कोटी १० लाख वाहनांना ‘एचएसआरपी’ लावणे बंधनकारक आहे. त्यासाठी सुरुवातीला ३१ मार्चपर्यंतची मुदत होती. त्याला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. त्यानंतर एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर १० हजारांची दंडात्मक कारवाई होईल. हा भुर्दंड टाळण्यासाठी वाहनधारक धडपड करतात. याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगारांनी घेतला आहे. मुदतवाढ दिल्याने आणखी तीन महिने सायबर गुन्हेगार या माध्यमातून फसवणूक करू शकतात.

..अशी होते फसवणूक

१) ‘एचएसआरपी’ नोंदणीसाठी ४५० रुपये शुल्क आहे. त्यासाठी बनावट लिंकवर क्लिक करून वेबसाइटवर वाहनधारक माहिती देतात. सायबर गुन्हेगार शुल्क भरण्यासाठी एटीएम कार्डचा क्रमांक आणि पासवर्ड विचारतात. त्याद्वारे फसवणूक करतात.

२) बनावट लिंकवर क्लिक केल्यास किंवा बनावट संकेतस्थळावर मोबाइल क्रमांक टाकल्यानंतर काही मिनिटांतच एक ‘एपीके फाइल’ वाहनधारकाच्या मोबाइल फोनवर येते. त्यावर एचएसआरपी प्रमाणपत्र किंवा ‘नंबर प्लेट’ असे लिहिलेले असते. वाहनधारक ‘एपीके फाइल’ डाउनलोड करतात. त्यामुळे फोनचा ॲक्सेस सायबर गुन्हेगारांकडे जातो. काही क्षणांतच सायबर गुन्हेगार वाहनधारकाचे बँक खाते रिकामे करतात.

सायबर गुन्हेगार हे सातत्याने नवे फंडे वापरतात. नागरिकांनी बनावट लिंक, वेबसाइट ओळखली पाहिजे. गुगलवर सर्च केल्यानंतर संबंधित माहिती, लिंक, वेबसाइट याबाबत खातरजमा करावी. ‘एचएसआरपी’ नोंदणीसाठी सायबर गुन्हेगार विविध लिंक सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. त्यावर क्लिक करू नये. - राेहित कांबळे, सायबर सुरक्षा तज्ज्ञ, चिखली

नागरिकांनी संशयित लिंकवर क्लिक करू नये, अनधिकृत वेबसाइटवर माहिती देऊ नये. सायबर फसवणूक झाल्यास १९३० या नॅशनल सायबर क्राइम हेल्पलाइनवर कॉल करावा. राष्ट्रीय सायबर क्राइम नोंदणी पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवावी. सायबर पोलिस किंवा स्थानिक पोलिस ठाण्याशीही संपर्क साधता येऊ शकतो. आपल्या बँकेला त्वरित माहिती द्यावी व एटीएम, डेबिट कार्ड ब्लॉक करावे. - रविकिरण नाळे, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे, पिंपरी-चिंचवड

Web Title: pimparichinchwad news Beware Bank account will be empty with one click; Unsafe registration for ‘High Security Number Plate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.