Pimpari-chinchwad : चार वर्षांमधील खरे चोर कोण ? प्रशासकीय कारभारावर हल्ला
By विश्वास मोरे | Updated: February 21, 2026 12:22 IST2026-02-21T12:18:57+5:302026-02-21T12:22:43+5:30
- महापालिकेच्या पहिल्याच सभेत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी: पाळीव कुत्र्यांचा उच्छाद, गढूळ पाणी, प्रदूषण, रस्ते, हरित सेतू, आरोग्य, पर्यावरणावर सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक

Pimpari-chinchwad : चार वर्षांमधील खरे चोर कोण ? प्रशासकीय कारभारावर हल्ला
पिंपरी: चार वर्षांची प्रशासकीय राजवट संपल्यानंतर नगरसेवकांनी महापौर निवडीनंतर शुक्रवारी (दि २० ) सर्वसाधारण सभेच्या रूपाने महापालिकेत पहिले पाऊल ठेवले. चार वर्षांतील कारभारावर नगरसेवकांनी जोरदार हल्लाबोल केला. पाळीव कुत्र्यांचा उच्छाद, गढूळ पाणी, प्रदूषण, रस्ते, हरित सेतू, आरोग्य, पर्यावरण अशा विविध मुद्द्यावर नगरसेवक आक्रमक झाले. 'प्रशासकीय काळात एकही काम झाले नाही, उन्मत्त झालेल्या अधिकाऱ्यांनी जनतेच्या पैशांची लूट केली, उधळपट्टी केली, चार वर्षांतील खरे चोर कोण हे शहराला समजायला हवे, अशी जोरदार टीका केली. श्वेत पत्रिका काढण्याची मागणी केली. त्यावर पुढील सभेपूर्वी प्रश्नविषयी तोडगा काढावा असे आदेश महापौर रवी लांडगे यांनी प्रशासनास दिले.
महापौर निवडीनंतर तहकूब झालेली सभा आज झाली. पिठासनाधिकारी म्हणून महापौर रवी लांडगे यांनी सभेचे कामकाज सुरु केले. आयुक्त श्रावण हर्डीकर आणि नगरसचिव मुकेश कोळप उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी गेल्या चार वर्षांतील प्रशासकीय राजवटीतील कामाविषयी तीव्र नाराजी आणि आक्रोश आहे, त्यामुळे एक तासभर चर्चा व्हावी, अशी मागणी केली.
त्यानंतर राजू मिसाळ यांनी भटक्या कुत्र्यांच्या मुद्यांवर लक्ष वेधले. आयुक्ताना कुत्र्याची प्रतिकृती भेट दिली. भटक्या कुत्र्यांवर काय केले हे सांगावे, यावर अधिवेशनात आमदारांना बोलावं लागते, यापेक्षा दुर्दैव काय? डॉ वैशाली घोडेकर म्हणाल्या, भटक्या कुत्र्याबाबत काही ऍक्शन घेतली तर नागरिकावर केसेस होत आहेत. भटक्यांसाठी शेल्टर निर्माण करावे.' डॉ सुहास कांबळे यांनी श्वानासाठीऊ संगोपन केंद्र उभारावे, अशी मागणी केली. सुलभा उबाळे यांनी प्रशासकीय काळातील श्वेत पत्रिका काढावी, त्यातून शेखर सिंह काय कारभार केला, हे सिद्ध होईल. केवळ निविदा आणि टीडीआर देण्याचे काम केले. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखे काम केले. डॉ. दगडे नावाप्रमाणे दगड झाले.' अशी टीका केली.
विनोद नढे म्हणाले, साडेचार हजार कोटींचे दायित्व, सारथी दोन महिन्यापासून बंद आहे. निविदा वाढल्या गौडबंगाल काय? ' शशिकांत कदम म्हणाले, 'महापालिकेला पुरस्कार मिळाले. आपण लायक आहोत.' नीता पाडाळे यांनी 'कामे कागदावरच झाले. झाली ती कामे निकृष्ट. अधिकारी निगरगट्ट झाले. आंधळ दळतंय कुत्रे पीठ खातय अशी आपली स्थिती आहे. ' जितेंद्र ननावरे यांनी कुत्रे पकडणारी यंत्रणा व्यवस्थित नाही, पाणी प्रश्न गंभीर आहे. शहराची वाट लागली आहे. अशी टीका केली.
महापौरांचा काळ सुवर्ण, तिजोरी खाली
योगेश बहल म्हणाले, 'महापौरांचा काळ सुवर्ण आहे. मात्र, तिजोरी खाली आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.' नितीन काळजे म्हणाले, 'कुत्र्यांचा बंदोबस्त करा. त्यासाठी नियमावली नाही. त्यामुळे जगणे मुश्किल झाले. प्राण्याचे हॉस्पिटल हवे. संदीप वाघेरे म्हणाले, कुत्री रोज दिसताहेत. आंधळ कोण? आयुक्त शेखर सिंह नको ती कामे काढली. इव्हेंट केले. आपले खिसे भरण्यासाठी? हे थांबायला हवेत. खरे चोर कोण हे शहराला समजायला हवे.' ' शेखर सिंह पापे धुवायला नाशिलक गेले त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी राजू बनसोडे यांनी केली.
..
अधिकारी मालक झाले. आता माज जिरवायला हवा
राहुल जाधव म्हणाले, आज अधिकारी गेले कुठे. चार वर्षांत झालेली अधिकाऱ्यांची मानसिक अवस्था बदलायला हवी' राहुल कलाटे म्हणाले, कुत्री समस्या, पिण्याचे पाणी याबाबत नियोजन करायला हवे. प्रशासकीय सेवेत नवीन तरुण आले आहेत. त्यांना अल्पवधीतच मोठे व्हायचे आहे. एक रूपयाच्या कामास चार रुपये घेतात. मिळकत हस्तांतरित शुल्क कमी करायला हवे.'
शिंदेसेना गटनेते विश्वजित बारणे म्हणाले, 'रावेत वरून पाणी उरचलते. खूप दूषित आहे. त्यातून भविष्यात कॅन्सर होऊ शकतो. चार वर्षांत कुणाच्या सांगण्यावरून कामे केली.' विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर म्हणाले, 'कोरोना काळात कुत्र्यांची नसबंदी झाली. सल्लागारावर कोटवधी खर्च होतात. चारवर्षांची नव्हे २०१७ पासून चौकशी करा. अधिकारी मालक झाले. आता माज जिरवायला हवा. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे रथाची दोन चाके. आमच्या चाकाला खिळे ठोकण्याचे काम सुरू आहे. पक्षनेते प्रशांत शितोळे म्हणाले, सभागृहात बाकीचे अधिकारी कुठे आहेत. चार वर्षांच्या कामांबबत आयुक्त शेखर सिंह दोषी आहेत. अधिकाऱ्यांची मनमानी आता चालणार नाही. शहराचे नाव बदनाम होऊ देणार नाही. चुकीचे काम केले तर वठणीवर आणू. सर्व प्रश्न गांभीर्याने घ्यायला हवेत.'
आयुक्त श्रावण हर्डीकर कुत्र्यांचे संतती नियमन, शेल्टर सूचनांची अंमलबजावणी करावी, तसेच नागरी प्रश्न सर्व सूचनांवर अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, अशी सूचना केली. महापौर लांडगे यांनी नगरसेवकांनी मांडलेल्या सूचनांची अंमलबाजवणी करण्याचे आदेश प्रशासनास दिले. पाणी, कचरा, पर्यावरण, रस्ते या प्रश्नाचे निराकरण पुढील सभेपर्यंत करायला हवे. प्रशासन काळात उद्धट उत्तर दिली जात होती, अशा तक्रारी आहेत. पुढे हे चालणार नाही. आता जनतेचे सेवक म्हणून काम करायचे आहे. सभागृहात अजित पवार आणि लक्ष्मण जगताप याचे तैलचित्र आणि अजित सृष्टी निर्माण करण्यासाठी सूचना केली.