रावेत - वाल्हेकरवाडी परिसरात नळाला गढूळ पाणी येत असून, या पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिकांना पोटदुखी, जुलाब, उलटी, कावीळ, चक्कर येणे यांसारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. परिसरात गढूळ व गाळमिश्रित पाणीपुरवठा झाल्यामुळे हे पाणी कसे प्यायचे? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
वाल्हेकरवाडी येथील अनेक भागात जलवाहिनीत दुर्गंधी गटारयुक्त पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. यातील सर्वाधिक तक्रारी तुकारामनगर, गावठाण परिसर, निसर्ग सोसायटी, भोंडवेनगर, शिवतीर्थ कॉलनी, नंदनवन कॉलनी, एकविरा कॉलनी, जय मल्हार कॉलनी, शिवले चाळ, चिंतामणी चौक, बिजलीनगर आदी परिसरातील नागरिकांना पाणी दूषित मिळत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांत उपचारासाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे.
वाल्हेकरवाडी परिसरात होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्याबाबत आमच्या विभागाला अद्याप एकही तक्रार आलेली नाही, तरीसुद्धा कर्मचाऱ्यांकडून संबंधित परिसराची पाहणी करून उपाययोजना केल्या जातील. - प्रवीण धुमाळ, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय मागील दोन-तीन दिवसांपासून रुग्णालयांत परिसरातील लहानांपासून ते वृद्धांपर्यंत जुलाब, उलटीचे रुग्ण वाढले आहेत. दूषित पाण्यामुळे रुग्णांच्या संख्येत ही वाढ झाली आहे. याबाबत वरिष्ठांना कळविले आहे. आशा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या परिसरातील पाहणी केली जात आहे. पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेऊन जाण्याबाबत पाणीपुरवठा विभागास कळविले आहे.-डॉ. प्रफुल्ल तपसाळकर, आरोग्य अधिकारी, पालिका दवाखाना, वाल्हेकरवाडीदोन-तीन दिवस झाले, वाल्हेकरवाडी परिसरात दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकजण जुलाब आणि उलटीने त्रस्त झाले आहेत. पाणीपुरवठा विभागाने तत्काळ दूषित पाणीपुरवठ्याची कारणे शोधून परिसराला स्वच्छ पाणीपुरवठा करावा.- आदेश नवले, सामाजिक कार्यकर्ते, वाल्हेकरवाडी दोन-तीन दिवसांपासून परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने माझ्या कुटुंबातील सर्वच सदस्यांना अचानकपणे पोटात दुखणे, जुलाब, उलटी होणे ही समस्या जाणवायला लागली. त्यांना आम्ही दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी ही समस्या दूषित पाण्यामुळे निर्माण झाली आहे, असे सांगितले. तर आमच्याच शेजारील एका व्यक्तीला दवाखान्यात ॲडमिट करावे लागले आहे. - कुणाल मुठाळ, रहिवासी, एकविरा कॉलनी, वाल्हेकरवाडी