नदीसुधार प्रकल्प पिंपळे निलखच्या नागरिकांना महागात; पहिल्याच पावसात सांडपाणी घरात
By विश्वास मोरे | Updated: May 10, 2025 19:05 IST2025-05-10T19:03:49+5:302025-05-10T19:05:07+5:30
पंचशीलनगरमधील घरांमध्ये पाणी शिरले होते. याबाबत नागरिकांनी प्रशासनावर टीका केली आहे.

नदीसुधार प्रकल्प पिंपळे निलखच्या नागरिकांना महागात; पहिल्याच पावसात सांडपाणी घरात
पिंपरी : पिंपळे निलख परिसरामध्ये मुळा नदीच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी भराव टाकण्यात आलेला आहे. जुन्या वाहिन्या फुटल्या आहे. त्यामुळे पहिल्याच पावसामध्ये नदीला जोडणाऱ्या सांडपाण्याच्या वाहिन्या तुंबल्या होत्या. त्यामुळे पंचशीलनगरमधील घरांमध्ये पाणी शिरले होते. याबाबत नागरिकांनी प्रशासनावर टीका केली आहे.
पिंपरी-चिंचवडच्या सीमेवर असणाऱ्या पिंपळे-निलख भागामध्ये मुळानदी सुधारचे काम सुरू झाले आहेत. त्यासाठी नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर भराव टाकला आहे. त्याचबरोबर काँक्रीटीकरण सुरू आहे. हे काम करत असताना जुन्या सांडपाण्याच्या वाहिन्या गाडल्या गेल्या आहेत. काही तुटलेल्या आहेत.
विशालनगरकडून बाणेरकडे जाणाऱ्या पुलाच्या अलीकडे पंचशीलनगर आहे. या भागामध्ये शुक्रवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. पावसामध्ये मैला सांडपाणी वाहिन्या तुंबल्या. त्यामुळे पंचशीलनगरमधील सुमारे ५० ते ६० घरांमध्ये पाणी शिरले आहे. मैला सांडपाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते अतुल खरात म्हणाले, 'या भागामध्ये नदी सुधारचे काम आहे. आणि त्यासाठी जुन्या सांडपाण्याच्या वाहिन्या बुजवल्या गेल्या आहेत. पहिल्याच पावसामध्ये सांडपाणी मोठ्या प्रमाणात तुंबले आणि नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यात मोठे नुकसान झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे म्हणाले, 'नदी सुधारच्या नावाखाली नदी बुजवण्याचे काम सुरू आहे. याकडे नागरिकांनी लक्ष वेधूनही कोणीही कुणीही दखल घेत नाही. परिणामी पहिल्याच पावसामध्ये पंचशीलनगरमध्ये पाणी शिरले होते. नागरिकांच्या घरात सांडपाणी घरांमध्ये शिरल्याने नुकसान झाले आहे. याबाबत महापालिका प्रशासनाला कळवले होते. अजून पावसाळा सुरु झालेल्या नाही. पहिल्याच पावसात जर अशी अवस्था होत असेल तर महापालिकेने गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.'
इलेक्ट्रॉनिक्स साहित्याचे नुकसान
अचानक जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पिंपळे निलख भागातील सखल भागात पाणी साचले होते. त्यातून वाहने काढताना चालकांना कसरत करावी लागली. सांडपाण्याच्या वाहिन्या, पावसाळी पाणी वाहून जाणारी गटारे तुंबल्याने घरात पाणी शिरले. त्यामुळे कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू साहित्याचे नुकसान झाले. नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.