पोलिसांच्या ‘उजळणी’ने रोहिंग्या, बांगलादेशी घुसखोरांना दणका
By नारायण बडगुजर | Updated: May 20, 2025 15:13 IST2025-05-20T15:11:16+5:302025-05-20T15:13:29+5:30
- पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वर्षभरात चार रोहिंग्यांसह पकडले ४७ बांगलादेशी

पोलिसांच्या ‘उजळणी’ने रोहिंग्या, बांगलादेशी घुसखोरांना दणका
पिंपरी :रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांच्या शोधासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी विशेष उपक्रम हाती घेत प्रत्येक पोलिस ठाण्यात ‘उजळणी’ करण्यात येत आहे. त्यामुळे आतापर्यंत ४ रोहिंग्या व ४७ बांगलादेशी घुसखोरांना पकडण्यात यश आले आहे.
बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्य करणाऱ्या रोहिंग्या व बांगलादेशी घुसखोरांना पकडण्याचे आदेश केंद्राकडून देण्यात आले. त्यानुसार पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय स्तरावरील दहशतवाद विरोधी शाखा (एटीबी) ‘ॲक्टिव्ह’ झाली. या शाखेकडून पोलिस आयुक्तालय हद्दीत ‘सर्च ऑपरेशन’ राबविण्यात आले. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी वेळोवेळी याचा आढावा घेतला. तसेच रोहिंग्या व बांगलादेशी घुसखोरांचा शोध घेण्याबाबत सूचना केल्या. त्यामुळे प्रत्येक पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या सर्व पथकांकडूनदेखील शोधमोहीम राबवण्यात येत आहे.
एटीबी आणि एटीपी
आयुक्तालयस्तरावरील ‘एटीबी’साठी एक पोलिस निरीक्षक आणि सात अंमलदार नियुक्त करण्यात आले. तसेच प्रत्येक पोलिस ठाण्यात दहशतवाद विरोधी कक्ष (एटीपी) कार्यान्वित करण्यात आला. सहायक निरीक्षक किंवा उपनिरीक्षक दर्जाचा एक अधिकारी आणि दोन अंमलदार या ‘एटीपी’ कक्षात नियुक्त करण्यात आले. ‘एटीबी’ आणि ‘एटीपी’ यांच्याकडून शोधमोहीम राबविण्यात आली.
‘उजळणी’चा झाला फायदा
‘एटीबी’चे पोलिस निरीक्षक विकास राऊत यांच्याकडून प्रत्येक पोलिस ठाण्यात दर पंधरवड्याला उजळणी शिबिर घेण्यात येते. यात पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले जाते. राेहिंग्या व बांगलादेशी घुसखोरांना कसे ओळखायचे, आधार कार्ड व मतदान ओळखपत्र हे बनावट असल्याचा संशय आल्यास क्यूआर कोड स्कॅन करून कसे शोधायचे, आधार कार्डवरील इश्यू डेट, तसेच जन्मदाखला यासह इतर कागदपत्रे याबाबत माहिती देण्यात येते. तसेच राेहिंग्या व बांगलादेशी घुसखोरांना मराठी किंवा हिंदी सहज बोलता येत नाही. बोली भाषेवरून त्यांची ओळख पटविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येते. त्यामुळे एटीबी आणि एटीपीच्या पोलिसांसह इतर पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनादेखील घुसखोरांना ओळखणे सहज शक्य होत आहे.
कामगार वसाहतींमध्ये ‘सर्च’
शहरात मोठमोठे बांधकाम प्रकल्प आहेत. या प्रकल्पांच्या कामगारांच्या वसाहती असतात. तेथे बांधकाम मजूर म्हणून रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर वास्तव्यास असण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे बांधकाम प्रकल्पाच्या कामगार वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात शोध घेतला जातो. यासह चाळ, भाडेकरू जास्त असलेल्या परिसरात बांगलादेशी घुसखोर वास्तव्यास असल्याची शक्यता वर्तवण्यात येते.
७४ पासपोर्ट, चार पॅनकार्ड रद्द
बांगलादेशी, रोहिंग्या नागरिकांनी भारतीय नागरिक असल्याचे भासवून अनधिकृतपणे काढलेले पासपोर्ट रद्द करण्यासाठी पिंपरी-चिंचवड एटीबीकडून पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, गोवा व गुवाहाटी येथून एकूण ७४ पासपोर्ट रद्द करण्यात आले आहेत. तसेच बांगलादेशी नागरिकांनी काढलेले चार पॅनकार्डदेखील रद्द करण्यात आले आहेत.
बांगलादेशी सिमकार्ड
रोहिंग्या तसेच बांगलादेशी घुसखोरांनी शहरात घर, मिळकत खरेदी केल्याचेही प्रकार उघडकीस आले. तसेच त्यातील काही जणांकडे बांगलादेशी सिमकार्ड मिळाले. बांगलादेशातील काही मोबाइल क्रमांकावर त्यांच्याकडून सातत्याने संपर्क साधण्यात आल्याचेही निष्पन्न झाले. सोशल मीडियावरदेखील यातील काही जण सक्रिय असल्याचे समोर आले.
शहरातील कामगार वसाहत, चाळ, भाडेकरूंची संख्या जास्त असलेल्या दाट वस्तींमध्ये रोहिंग्या व बांगलादेशी घुसखोरांचा शोध घेण्यात येत आहे. त्यासाठी पोलिस आयुक्तालय व पोलिस ठाणे स्तरावरदेखील नियमित बैठक घेऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे. - विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड