वर्षभरात २८ हजार लोकांना मोकाट कुत्र्यांचा चावा; सात वर्षांत दुपटीने वाढले प्रकार

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: July 20, 2025 12:14 IST2025-07-20T12:13:53+5:302025-07-20T12:14:44+5:30

- पिंपरी-चिंचवड शहरात एक लाखांवर मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार : महापालिकेकडून दरवर्षी कोट्यवधींचा खर्च करूनही उपाययोजना अपुऱ्या; यंत्रणेतील समन्वयाचा अभाव आणि प्राणिप्रेमींचा हस्तक्षेप

pimpari-chinchwad Over 28,000 dog bites in a year; Types have doubled in seven years | वर्षभरात २८ हजार लोकांना मोकाट कुत्र्यांचा चावा; सात वर्षांत दुपटीने वाढले प्रकार

वर्षभरात २८ हजार लोकांना मोकाट कुत्र्यांचा चावा; सात वर्षांत दुपटीने वाढले प्रकार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात मोकाट आणि भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. महिन्याला सरासरी दोन हजार नागरिकांना या कुत्र्यांकडून चावा घेतला जातो, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही कुत्र्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत असल्याने शहरवासीयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, २०२४-२५ या वर्षात २८ हजार ९९ नागरिकांना कुत्र्यांनी चावा लागला आहे. सात वर्षांपूर्वी म्हणजेच २०१८-१९ मध्ये ही संख्या १४ हजार ८४२ होती. मागील सात वर्षांत चाव्याच्या घटनांत दुपटीहून अधिक वाढ झाली असून, शहरात सुमारे एक लाख मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार सुरू आहे. रस्त्यांवर, चौकांत, बाजारात आणि निवासी भागात कुत्रे टोळ्यांनी फिरताना दिसतात. रात्रीच्या वेळी वाहनचालक आणि पादचाऱ्यांवर कुत्र्यांनी धाव घेण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. विशेषतः लहान मुलांवर हल्ला करून चाव्याच्या घटना अधिक आहेत.

नसबंदीच्या एका शस्त्रक्रियेचा खर्च हजार रुपये

महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाद्वारे मोकाट कुत्र्यांची नसबंदी केली जाते. एका शस्त्रक्रियेचा खर्च सुमारे एक हजार रूपये असून, वर्षाला लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र, अपेक्षित प्रमाणात नसबंदी न होण्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढतच आहे.

भटक्या कुत्र्यांना पोसणाऱ्यांचा वाढता त्रास

शहरातील विविध भागात टपऱ्या, चायनीज व खाद्यपदार्थ विक्रेते तसेच मांस विक्रेते शिल्लक आणि उरलेले अन्न उघड्यावर फेकतात. काही प्राणिप्रेमीही शिल्लक अन्न गोळा करून कुत्र्यांना देतात. त्यामुळे भटक्या कुत्र्यांना सहज अन्न उपलब्ध होते. परिणामी त्यांची संख्या झपाट्याने वाढते.

तक्रारींची दखल कोणीच घेत नाही 

महापालिकेच्या सारथी हेल्पलाइनवर किंवा थेट कार्यालयात तक्रार करूनही अनेक तक्रारींवर कारवाई होत नसल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे. कुत्रे पकडण्याचे पथक फक्त सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेतच कार्यरत असते. सायंकाळनंतर तक्रारींवर दखल न घेतल्यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढलेला आहे.

प्रशासन अपयशी, उपाययोजना अपुऱ्या

मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण मिळविण्याचे महापालिकेचे प्रयत्न अपुरे ठरत आहेत. यंत्रणेतील समन्वयाचा अभाव आणि प्राणिप्रेमींचा हस्तक्षेप यामुळे समस्येचे गांभीर्य वाढले आहे. कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नसबंदी मोहीम अधिक प्रभावीपणे राबवावी, अन्न टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी आणि तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद देणारी यंत्रणा कार्यान्वित करणे अत्यावश्यक बनले आहे. 

 भटक्या कुत्र्यांकडून चाव्यांच्या घटना :

आर्थिक वर्षानुसार जखमी नागरिकांची संख्या :

२०१८-१९ - १४,८४२

२०१९-२० - १२,७५१

२०२०-२१ - १३,८३२

२०२१-२२ - १३,८९२

२०२२-२३ - १८,५००

२०२३-२४ - २४,१६९

२०२४-२५ - २८,०९९

नेहरूनगर येथील कुत्रे नसबंदी केंद्रात पिंजऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. एकूण १६ पदे भरून मनुष्यबळही वाढवण्यात आले असून, श्वान नसबंदी मोहिमेचा वेग वाढविण्यावर भर दिला जात आहे.  - संदीप खोत, उपायुक्त, महापालिका

 

कुत्र्यांच्या चाव्यामुळे रेबिजसारखा जीवघेणा रोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात ‘अँटी रेबिज’ इंजेक्शन मोफत दिले जाते. दरवर्षी १० हजार इंजेक्शनच्या बाटल्या खरेदी केल्या जात आहेत. - डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

Web Title: pimpari-chinchwad Over 28,000 dog bites in a year; Types have doubled in seven years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.