पिंपरी : पंचवीस वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरातील रंगकमींकडून नाट्य संकुलाची मागणी होत होती. या संदर्भातील घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी चिंचवड येथील कार्यक्रमात केली.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये ७९ वे नाट्य संमेलन १९९९ मध्ये झाले होते. तेव्हापासून वेगवेगळ्या कलाविषयक नाट्य विषयक उपक्रमांच्या कार्यक्रमांमध्ये नाट्य संकुलाची चर्चा होत होती. कलावंतांच्या नाट्य संकुलाच्या मागणीकडे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दुर्लक्ष केले होते. रंगकर्मींच्या नाट्य संकुलाच्या मागणीकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष होत आहे. "राजकीय इच्छाशक्ती अभावी नाट्यसंकुल रखडले' असे वृत्त लोकमतने दि. शनिवारच्या हॅलो पिंपरी चिंचवड मध्ये प्रसिद्ध केले होते. यामध्ये नाट्य संकुलाच्या मागणी बरोबरच नाट्य संकुल कसे असावे यासंदर्भातील भूमिका मांडली होती.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सोहळ्यामध्ये याविषयीचा धागा प्रसिद्ध कलावंत सुरेश साखवळकर यांनी पकडला. नाट्य परिषदेत त्यानंतर नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब यांनीही नाट्यकलेच्या संवर्धनासाठी नाट्यसंकुल व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केले. त्यानंतर प्रसिद्ध रंगकर्मी अशोक हांडे यांनीही आपल्या मनोगतामध्ये पिंपरी चिंचवड शरद नाट्य संकुल व्हावे, अशी आग्रही मागणी केली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या मनोगत यामध्ये रंगभूमीचा आढावा घेत असतानाच पिंपरी चिंचवड मध्ये नाट्य चळवळ वाढत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरात नाट्य संकुल हवे, अशी येथील कलावंतांची अपेक्षा आहे. त्यानुसार शहरामध्ये नाट्यसंकुल उभारण्यात येणार आहे. यासाठी आयुक्त शेखर सिंह यांच्याबरोबर सोमवारी बैठक व्हावी आणि त्यामध्ये नाट्यसंकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी अशी सूचना महापालिका प्रशासनाला करणार आहे. कला आणि कलावंतांच्या संवर्धनासाठी नाट्यसंकुल तातडीने उभारण्यात यावे.