पिंपरी :पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमार्फत इंद्रायणी आणि पवना नदीप्रदूषण नियंत्रणासाठी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेत यासंबंधी निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. या प्रकल्पाच्या माध्यमातून इंद्रायणी आणि पवना नदी पुन्हा स्वच्छ, निसर्गरम्य, प्रदूषणमुक्त करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.
नदी पात्रात थेट येणारे सांडपाणी रोखण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रांची उभारणी, नाल्यांमधून नदीकडे जाणाऱ्या दूषित पाण्याचे योग्य व्यवस्थापन, औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी यासह इतर दूषित पाण्यासाठी सांडपाणी प्रकल्प केंद्राच्या (एसटीपी) उभारणीसंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. इंद्रायणी आणि पवना नदीतील प्रदूषण दूर करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायोजनांच्या अनुषंगाने पुढील ३० वर्षांचे नियोजन करून प्रकल्पाची आखणी करण्याचे निर्देश महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी बैठकीत दिले.
सांडपाणी प्रकल्प केंद्राच्या उभारणीसह नदी किनाऱ्यांवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई तसेच नदी पात्रात दूषित पाणी सोडणाऱ्या सोसायट्यांसह संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याची सूचना यावेळी आमदार महेश लांडगे यांनी केली. या बैठकीस मुख्य अभियंता रिनाज पठाण, सह महानियोजनकार श्वेता पाटील, जमीन व मालमत्ता विभागाचे सहआयुक्त हिंमत खराडे, अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाच्या सहआयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, अधीक्षक अभियंता प्रशांत पाटील, कार्यकारी अभियंता अनिता कुलकर्णी उपस्थित होते.