मोशी येथे इमारतीच्या डक्टमध्ये आग; अग्निशामक दलाच्या जवानांनी केली पाच ते सहा जणांची सुटका
By नारायण बडगुजर | Updated: April 24, 2025 15:59 IST2025-04-24T15:57:22+5:302025-04-24T15:59:46+5:30
कुमार प्रिन्सव्हिला सोसायटीच्या आठव्या मजल्यावरील डक्टमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली.

मोशी येथे इमारतीच्या डक्टमध्ये आग; अग्निशामक दलाच्या जवानांनी केली पाच ते सहा जणांची सुटका
पिंपरी : बारा मजली इमारतीच्या डक्टमध्ये आग लागली. त्यामुळे माेठा धूर होऊन नागरिकांना त्रास जाणवत होता. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी पाच ते सहा जणांची सुटका केली. मोशी येथील बोराडेवाडी येथे कुमार प्रिन्सव्हिला या सोसायटीमध्ये गुरुवारी (२४ एप्रिल) सकाळी पावणेनऊच्या सुमारास आगीची ही घटना घडली.
महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या चिखली उपकेंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुमार प्रिन्सव्हिला सोसायटीच्या आठव्या मजल्यावरील डक्टमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, आठव्या मजल्यावरील डक्टमधील वायर व इतर साहित्य जळाल्याने मोठ्या प्रमाणात धूर झाला. आठव्या मजल्यावरून धूर बाराव्या मजल्यापर्यंत जात होता. काही नागरिकांना धुरामुळे त्रास जाणवत होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी तीन ते चार महिलांसह पाच ते सहा जणांची सुटका करून सुरक्षितपणे इमारतीच्या खाली आणले. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
महापालिकेच्या चिखली अग्निशमन उपकेंद्राचे उपअधिकारी विनायक नाळे, तांडेल लक्ष्मण होवाळे, फायरमन अंकुश बडे यांनी आग नियंत्रणात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. आगीचे कारण समजू शकले नाही.