कागदोपत्रीच ‘डीजेमुक्ती’...! नागरिकांच्या मनस्तापाला जबाबदार कोण?
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: September 9, 2025 16:04 IST2025-09-09T16:04:24+5:302025-09-09T16:04:39+5:30
- महापालिका-प्रदूषण मंडळाच्या आकडेवारीत तफावत, पोलिसांची दिखाऊ कारवाई

कागदोपत्रीच ‘डीजेमुक्ती’...! नागरिकांच्या मनस्तापाला जबाबदार कोण?
पिंपरी : गणेश विसर्जन मिरवणुकीत पिंपरी-चिंचवड शहर अक्षरशः डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने हादरले. १०० डेसिबलपेक्षा अधिक आवाज नागरिकांनी प्रत्यक्ष अनुभवल्याचा दावा केला असतानाही महापालिका आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीत आकाश-पाताळाचा फरक असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. पोलिसांनी केवळ पाच मंडळांवर गुन्हे दाखल करून जबाबदारी झटकली आहे.
शहरातील विविध मंडळांकडून डीजे, साउंड सिस्टीम आणि ढोल-ताशांचा धडाका सुरू होता. दारे-खिडक्या लावूनही घरातील वस्तू कंपनामुळे हलू लागल्या, असा अनुभव नागरिकांनी सांगितला. रुग्ण, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य जनतेला रात्रभर मनस्ताप सहन करावा लागला. मात्र अधिकृत पातळीवर “मर्यादित डेसिबल आवाज” असल्याचा दावा केल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
फक्त नोटिसांचा फार्स
प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेच्या आकडेवारीच्या आधारे पोलिस फक्त नोटिसा बजावतात. पण त्यानंतर कारवाई होत नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक उपाययोजना न झाल्यास डीजेमुक्ती ही केवळ कागदोपत्री राहील, अशी संतप्त टीका नागरिकांनी केली आहे.
सोलापूरने दाखवली दिशा..!
सोलापूर जिल्ह्यात प्रशासनाच्या कठोर भूमिकेमुळे डीजेमुक्त विसर्जन पार पडले. मर्यादित आवाजात पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका झाल्या. मग पिंपरी-चिंचवडमध्ये असे ठोस पाऊल उचलले जात नाही का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
आवाजाची कमाल पातळी (प्रदूषण नियंत्रण मंडळ)
परिसर - २०२५ (कमाल पातळी डेसिबलमध्ये)
पिंपरी (शांतीनगर) - १०५.१
चिंचवड (चापेकर चौक) - १०६.२
भोसरी - ८८.४
आवाजाची कमाल पातळी (महापालिका)
परिसर - २०२५ (कमाल पातळी डेसिबलमध्ये)
सांगवी (पवनानगर) : ७८.७
भोसरी (बस टर्मिनल) : ८३.४
मोशी घाट : ८६.७
निगडी (भक्ती-शक्ती, चौक) : ८७.९
पिंपरी (सुभाषनगर) : ८९.३
अधिकाऱ्यांचे दावे
“महापालिकेच्या यंत्रणेकडून शहरातील प्रमुख ठिकाणी आवाजाची पातळी मोजली जाते. मर्यादेपेक्षा आवाज जास्त असल्यास संबंधित मंडळांना नोटीस बजावली जाईल.” - संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, महापालिका
“गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आवाजाची पातळी आणखी वाढली आहे. सर्वच ठिकाणी आवाज सर्वसामान्य मर्यादेपेक्षा अधिक होता.” - मंचक जाधव, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ