पिंपरी :पिंपरी-चिंचवड भाजप शहर कार्यकारिणीची घोषणा बुधवारी (दि. २७) रात्री करण्यात आली. मात्र, त्यामुळे नाराजी उफाळली असून नवनियुक्त उपाध्यक्ष तुषार हिंगे यांनी गुरुवारी तडकाफडकी राजीनामा दिला. ज्येष्ठ कार्यकर्ते अमोल थोरात, सचिन काळभोर, महेश कुलकर्णी यांना कार्यकारिणीत स्थान न मिळाल्याने असंतोष धुमसू लागला आहे.
शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी गणेशोत्सवाचा मुहूर्त साधत १२६ पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली. यात चार सरचिटणीस, आठ उपाध्यक्ष, आठ सचिवांसह विविध प्रकोष्ठांचे अध्यक्ष आणि सदस्यांचा समावेश आहे. महिला मोर्चाच्या अध्यक्षा म्हणून सुजाता पालांडे, तर युवा मोर्चा अध्यक्षपदी दिनेश यादव, वरिष्ठ उपाध्यक्षपदी काळूराम बारणे यांची निवड केली आहे.
नव्या कार्यकारिणीत काहींना बढती मिळाली असली तरी, काहींना पूर्वीच्या पदावरच ठेवण्यात आल्याने असंतोष आहे. अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांना स्थान न मिळाल्याने नाराजी वाढली आहे. नव्या कार्यकारिणीत काटे यांनी जुने, नवे, तरुण आणि अनुभवींचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी पालिका निवडणुकीचा विचार करून ती बनवली गेली आहे. मात्र नाराजी उफाळली आहे. उपाध्यक्ष तुषार हिंगे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला.
विविध मोर्चे व प्रकोष्ठ
अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष अनिल घोलप, ओबीसी मोर्चा चेतन भुजबळ, व्यापारी आघाडी राजेंद्र चिंचवडे, कायदा आघाडी अॅड. गोरख कुंभार, सोशल मीडिया सेल सागर बिरारी, सांस्कृतिक सेल विजय भिसे, माजी सैनिक सेल देविदास साबळे, वैद्यकीय प्रकोष्ठ डॉ. अमित नेमाने, बेटी बचाव बेटी पढाव प्रीती कामतीकर यांची घोषणा करण्यात आली.
प्रमुख पदाधिकारी
सरचिटणीस : अॅड. मोरेश्वर शेडगे, विकास डोळस, मधुकर बच्चे, वैशाली खाड्ये.
उपाध्यक्ष : अॅड. विनायक गायकवाड, तुषार हिंगे (राजीनामा), राम वाकडकर, अमित पसरणीकर, रमेश वाहिले, अजित भालेराव, विनोद मालू.
सचिव : नवनाथ ढवळे, राजेंद्र बाबर, खंडूदेव कथोरे, दीपक भोंडवे, अॅड. युवराज लांडे, मंगेश कुलकर्णी, गिरीश देशमुख, अभिजित बोरसे.
कोषाध्यक्ष : हेमचंद्र मासुळकर
कार्यालय प्रमुख : संजय परळीकर
संतोष तापकीर यांचा आत्मदहनाचा इशारा
भाजपमध्ये गेली ३० वर्षे कार्यरत असलेले संतोष भाऊसाहेब तापकीर यांनी संघटनेतील अन्यायकारक वागणुकीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कार्यकारिणीत अपेक्षित पद न मिळाल्याने आत्मदहनाचा इशारा दिला आहे. पक्षाने आजवर मंडल सरचिटणीस, दोन वेळा मंडल अध्यक्ष, किसान मोर्चा शहराध्यक्ष, शहर उपाध्यक्ष व शहर चिटणीस अशी जबाबदारी दिली. मात्र, आता शहर सरचिटणीस पद न देता खच्चीकरण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच इतर पदाधिकारीही नाराज आहेत. या निर्णयामुळे पक्षांतर्गत गटबाजीचे संकेत मिळत असून कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
पक्षाची कार्यकारिणी जाहीर करण्यापूर्वी तीनशेवर कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या. स्थानिक नेत्यांशी चर्चा करून समाजघटक, जाती आणि आगामी महापालिका निवडणुकीचा विचार करून ही रचना केली आहे. ज्यांना यावेळी संधी मिळाली नाही, त्यांना भविष्यात योग्य संधी दिली जाईल. संधी देऊनही नाराज असलेल्यांना संधी देण्यासाठी ही काही एका आमदाराची कार्यकारिणी नाही, ही पूर्ण शहराची कार्यकारिणी आहे. - शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजप,प्रमुख पदाधिकारी