इच्छुकांची ‘अर्ज मागणी’ मोहीम जोरात;महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेची चाहुल
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: December 10, 2025 13:44 IST2025-12-10T13:43:04+5:302025-12-10T13:44:33+5:30
- वरिष्ठांकडे उमेदवारीसाठी मोर्चेबांधणीची घाई; पक्ष कार्यालयांमध्ये लगबग; शिष्टमंडळांची धावपळ

इच्छुकांची ‘अर्ज मागणी’ मोहीम जोरात;महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेची चाहुल
पिंपरी : महापालिका निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू होऊ शकते, त्यामुळे शहरातील राजकीय हालचालींना जोरदार वेग आला आहे. पक्ष कार्यालयांमध्ये इच्छुकांची लगबग, नेत्यांच्या घरी फेऱ्या, शिष्टमंडळांची धावपळ, तर सोशल मीडियावर उमेदवारांची अचानक वाढलेली सक्रियता यामुळे निवडणुकीची घोषणा होणे बाकी असले तरी शहरात निवडणुकीचा माहौल बनत असल्याचे चित्र आहे.
दिवसभर पक्ष कार्यालयांत सुरू असलेले अर्जवाटप आणि अर्ज भरण्याची इतकी गडबड दिसत आहे की, शहरात सध्या अर्ज मागणी मोहीम अधिक जोमात दिसत आहे. वाट पाहण्यापेक्षा अर्ज भरणे श्रेयस्कर, अशी भूमिका घेत अनेक इच्छुकांनी शहरातील राजकीय वातावरण तापवून टाकले आहे. आगामी काही दिवसात आचारसंहिता लागू होताच या धावपळीला आणखी वेग येणार असून, पिंपरी - चिंचवडमधील राजकीय वातावरण तापणार आहे.
भाजप सर्वाधिक आघाडीवर; ६५० अर्ज
भाजपकडे पुन्हा एकदा इच्छुकांची सर्वाधिक गर्दी झाली आहे. तब्बल ६५० अर्ज दाखल होताच अंतर्गत स्पर्धा तीव्र झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिकीट वाटपात मोठे राजकारण होणार आहे. त्यापाठोपाठ शिवसेना (ठाकरे गट) १३६, काँग्रेसकडे ११०, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाकडे ८७ अर्ज दाखल झाले आहेत. सत्ताधारी शिवसेनेकडे (शिंदे गट) मात्र केवळ ६० अर्ज दाखल झाल्याने गटांतर्गत नाराजी वाढल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीने (अजित पवार गट) थेट उमेदवारांच्या मुलाखतींची प्रक्रिया सुरू केली आहे. मनसे, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पक्ष, रिपाइंसह इतर लहान पक्षांनीही अर्जवाटप सुरू केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत लहान पक्षांची उपस्थितीही लक्षणीय राहणार आहे.
उमेदवारीसाठी ‘सेटिंग’
आचारसंहिता लागण्याआधीच शहरातील राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत. काही इच्छुकांनी तिकीट पक्के करण्यासाठी नेते, गटप्रमुख, प्रभावी पदाधिकारी यांच्या दाराशी रात्रंदिवस हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. सेटिंग असेल तर तिकीट पक्के या समीकरणानुसार उमेदवारांची धडपड सुरू आहे. काही ठिकाणी पक्षांतराच्या चर्चाही रंगू लागल्या असून, काही इच्छुकांनी सुरक्षित गटात आश्रय मिळवण्यासाठी संपर्क वाढवला आहे.
‘मीच उमेदवार’ म्हणून दाखविण्याची घाई
निवडणुकीत स्वतःचे नाव पुढे राहावे, या उद्देशाने अनेक इच्छुकांनी सोशल मीडियावर जोरदार मोहीम सुरू केली आहे. अचानक पोस्टर, बॅनर, सेवाकार्याचे फोटो, वाढलेल्या भेटीगाठींचे व्हिडीओ यामुळे अनेकांनी स्वतःला अनधिकृत उमेदवार म्हणून दाखवून देण्याची घाई सुरू केली आहे.