पवना आणि इंद्रायणी नदी सर्वाधिक प्रदूषित;शहरातील नाले, उद्योगांच्या रसायनयुक्त पाण्यामुळे प्रदूषणात भर
By विश्वास मोरे | Updated: August 8, 2025 16:55 IST2025-08-08T16:55:14+5:302025-08-08T16:55:41+5:30
पर्यावरण अहवालातून महापालिकेची कबुली, मानवी आरोग्यासह जलचरांसाठी घातक; उपाययोजनांकडे दुर्लक्ष

पवना आणि इंद्रायणी नदी सर्वाधिक प्रदूषित;शहरातील नाले, उद्योगांच्या रसायनयुक्त पाण्यामुळे प्रदूषणात भर
पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहराच्या जीवनदायिनी असणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांचे प्रदूषण वाढत आहे. शहरातील नाले, उद्योगांचे रसायनयुक्त पाणी त्यात भर टाकत असल्याची कबुली महापालिकेने पर्यावरण अहवालात दिली आहे. पवना सर्वाधिक प्रदूषित नदी असल्याचा निष्कर्ष त्यात आहे. नद्यांच्या प्रभावी उपाययोजनांकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.
पवना नदीची लांबी २४.४, इंद्रायणी नदीची लांबी २०.६ आणि मुळा नदीची लांबी १२.४ किलोमीटर आहे. पवना नदीवर २५ ठिकाणी, इंद्रायणी नदीवर १२ ठिकाणी, मुळा नदीवर १० ठिकाणी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेने उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीनही ऋतूंत प्रदूषणाच्या नोंदी घेतल्या. त्यात शहरातील नद्यांचे आरोग्य बिघडत असल्याची माहिती समोर आली आहे. पवना नदी किवळेपासून ते दापोडीपर्यंत, इंद्रायणी नदी तळवडेपासून, तर आळंदीपर्यंत आणि मुळा नदी वाकडपासून दापोडीपर्यंत प्रदूषित होत असल्याचे आढळून आले आहे.
काय आहे निष्कर्ष?
पवना, मुळा व इंद्रायणी या नद्यांची ऋतुमानानुसार तपासणी केली असता पवना नदी अधिक प्रमाणात प्रदूषित दिसून येते. ती शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहत असून, तिला मिळणारे प्रदूषित नाले प्रदूषणास कारणीभूत ठरत आहेत. त्याखालोखाल इंद्रायणीचे प्रदूषण होत आहे. ती मुख्यतः औद्योगिक क्षेत्रातून वाहत असल्याने तेथील प्रदूषित पाणी नदीच्या प्रदूषणात भर घालत आहे. हे पाणी जलचरांसाठी घातक आहे, असा निष्कर्ष आहे.
नद्यांच्या पाण्याची गुणवत्ता असे आहे मानक
पीएच : ६.५ ते ९
डीओ : २ पेक्षा जास्त
बीओडी : १० पेक्षा कमी
सीओडी : ५० पेक्षा कमी
टीएसएस : २० पेक्षा कमी
नद्यांच्या पाण्याची गुणवत्ता सरासरी (हिवाळा)
गुणवत्ता मानक, पवना, इंद्रायणी, मुळा
पीएच : ७.५, ७.१, ७.२
डीओ : १.९, २.७ , ३.३
बीओडी : ६१, ६८, ७३
सीओडी : २६, २१, २३
टीएसएस : ४०, ३०, ३०
प्रक्रिया न झालेले सांडपाणी, रसायनयुक्त पाणी थेट शहरांमधील नद्यांमध्ये सोडले जात आहे. याबाबत पर्यावरणवादी संघटनांनी आवाज उठवला आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नद्यांचे प्रदूषण रोखण्यास प्राधान्य देण्यापेक्षा, नदी सुशोभीकरणाचा घाट महापालिकेने घातला आहे. दुर्लक्षामुळे नद्यांची गटारगंगा होऊ लागली आहे. नद्यांना पुनरुज्जीवन द्यावे. - धनंजय शेंडबाळे, पर्यावरणवादी