संत तुकाराम नगर बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 18:02 IST2025-03-02T17:54:13+5:302025-03-02T18:02:00+5:30
स्थानकात मेट्रोसाठी वाहनतळ दिले आहे. मात्र, वाहनतळ सायंकाळी निर्मनुष्य असते.

संत तुकाराम नगर बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मागणी
पिंपरी : दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे संत तुकाराम नगर बसस्थानकाची पाहणी करण्यात आली. बसस्थानकात सुरक्षारक्षक नियुक्त करावेत, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, राडारोडा उचलावा, अशी मागणी यावेळी संघटनेतर्फे करण्यात आली.
संघटनेच्या अध्यक्ष दुर्गा भोर, छावा ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष अभय भोर, संत तुकाराम नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरख कुंभार, संत तुकाराम नगर बसस्थानकाचे आगारप्रमुख बालाजी मारुतीराव सूर्यवंशी (पाटील), बसस्थानक प्रमुख वैशाली कांबळे उपस्थित होते. बसस्थानकासाठी केवळ तीन सुरक्षारक्षक आहेत. बसस्थानकाला प्रवेशद्वार नसल्यामुळे अनेक गाड्या स्थानकात आणल्या जातात. स्थानकासाठी आणखी सुरक्षारक्षक नियुक्त करणे आवश्यक आहे.
स्थानकात मेट्रोसाठी वाहनतळ दिले आहे. मात्र, वाहनतळ सायंकाळी निर्मनुष्य असते. स्वच्छतेचा अभाव आहे. हिरकणी कक्षाची पाहणी करण्यात आली. काही झाडांच्या फांद्या काढणे आवश्यक आहे. काही ठिकाणी राडाराेडा पडलेला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे कमी आहेत. रात्रीच्या वेळेस पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी करण्यात आली. बसस्थानकाच्या बाजूलाच आयटी कंपनी आणि मेट्रो स्टेशन आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.