पिंपरी : शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुखावर चाकू उगारून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. पिंपरी येथील संत तुकाराम नगरमध्ये शुक्रवारी (२१ मार्च) दुपारी १२.१८ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
राजेश चिमणराव वाबळे (५०, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी संत तुकाराम नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शशिकांत मधुकर भालेरावर (५५, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बीएनएस २०२३ चे कलम १३१, ३५१ (३) सह महाराष्ट्र पोलिस अधिनियमचे कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेश वाबळे हे शिवसेना (एकनाथ शिंदे) उपजिल्हा प्रमुख आहेत. संत तुकाराम नगर येथे वाबळे यांच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे बांधकाम होत असल्याने तेथे फिर्यादी वाबळे गेले. ते कामगारांशी बोलत असताना संशयित शशिकांत भालेकर हा अचानक फिर्यादी वाबळे यांच्या पाठीमागून आला. काही कारण नसताना भालेकर याने त्याच्या हातात असलेला चाकू वाबळे यांच्यावर उगारला. तेव्हा वाबळे यांच्यासोबत असलेला कामगार जोरात ओरडला. तसेच त्यावेळी शशिकांत भालेकर याचे वडील तेथे आले. त्यांनी शशिकांत याला तेथून दूर नेले. मी शिक्षा भोगून आलो आहे. माझा बाप जिवंत आहे तोपर्यंत तू आहे. माझा बाप गेला की मी तुझा गेम करतो, अशी धमकी शशिकांत भालेकर याने दिली. त्यानंतर त्याचे वडील त्याला घेऊन गेले. पोलिस उपनिरीक्षक शशिकांत गाडेकर तपास करीत आहेत.
‘माझ्या जिवीतास धोका’
शशिकांत भालेकर याने चाकू उगारल्याच्या घटनेनंतर फिर्यादी राजेश वाबळे यांनी डायल ११२ या क्रमांवर संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. माझ्या जिवतास धोका आहे, असे फिर्यादी राजेश वाबळे यांनी पोलिसांना सांगितले.