पिंपरी : हॉटेल चालविण्यासाठी प्रत्येक महिन्याला १० हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (दि.१७) रात्री खेड तालुक्यातील वराळे गावातील हॉटेल श्रेयस येथे घडली.
महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश गोपीनाथ शिंदे (३९, रोहकल, खेड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी गणेश बाबाजी डुंबरे (३१, ओतूर, जुन्नर) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी डुंबरे यांचे वराळे येथे हॉटेल आहे. आरोपी नागेश बुधवारी रात्री डुंबरे यांच्या हॉटेलमध्ये आला. त्याने डुंबरे यांना धमकी देत इथे हॉटेल चालवायचे असेल तर मला प्रत्येक महिन्याला १० हजार रुपये हप्ता द्यावा, लागेल, अशी मागणी केली तसेच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलेसोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. डुंबरे आणि हॉटेलमधील कामगाराला मारहाण करून धमकी दिली.