पिंपरी : मे मध्ये दिल्लीतील एका रुग्णालयात लागलेल्या आगीत सात मुलांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णालयाच्या अग्निसुरक्षेचा आढावा घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले होते; मात्र गेल्या सहा महिन्यांमध्ये ६२३ रुग्णालयांपैकी ५६८ रुग्णालयांना पत्र देण्यात आले. यामधील फक्त ५६ रुग्णालयांनी अग्निशामक यंत्रणा बसविली असल्याचे समोर आले आहे.
राजधानी पूर्व दिल्लीतील विवेक विहार येथील दिल्ली न्यू बॉर्न बेबी केअर हॉस्पिटलला २५ मे ला रात्री नवजात बालकांच्या खासगी रुग्णालयात भीषण आग लागली. या भीषण आगीत ७ मुलांचा होरपळून मृत्यू झाला, तर इतर ५ नवजात बालके गंभीर झाली होती. या घटनेची दखल आयुक्त शेखर सिंह यांनी घेतली. पिंपरी-चिंचवड शहरात एकूण किती रुग्णालये आहेत, त्यापैकी किती रुग्णालयांमध्ये सक्षम अग्निरोधक यंत्रणा आहे, याची सविस्तर माहिती घेण्याचे आदेश त्यांनी वैद्यकीय विभाग आणि अग्निशमन विभागास दिले होते.
महापालिका बजावणार नोटीस.....
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे ६२३ रुग्णालयांची नोंद आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये ५६८ रुग्णालयांना अग्निशमन विभागाकडून अग्निरोधक यंत्रणा बसविण्याबाबत पत्र देण्यात आले. या पत्राची दखल घेत १८४ रुग्णालयांची ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्याबाबत अनिशमन विभागाकडे अर्ज दाखल केला. अग्निशमन विभागाने रुग्णालयांची पाहणी करून रुग्णालयाच्या यंत्रणेमध्ये त्रुटी असल्याचे दिसून आले. या त्रुटी दूर करण्यासाठी संबंधित रुग्णालयांना सांगण्यात आले. आतापर्यंत केवळ ५६ रुग्णालयांमध्ये अग्निरोधक यंत्रणा सक्षम असल्याचे दिसून आले. तसेच शहरातील ४६८ रुग्णालयांना सहा महिन्यांपूर्वी दिलेल्या पत्रांनंतर आता नोटीस बजावण्यात आली आहे.
शहरातील रुग्णालयांना पत्र दिल्यानंतरही काही रुग्णालयांनी अग्निरोधक यंत्रणा बसविली नाही. त्यामुळे त्यांना नोटीस देण्याचे काम सुरू आहे. जर नोटीस दिल्यानंतरही त्यांनी अग्निरोधक यंत्रणा बसविली नाही, तर त्या रुग्णालयाच्या परवान्याचे नूतनीकरण करू नये, असे वैद्यकीय विभागास कळविणार आहे. - मनोज लोणकर, उपायुक्त, अग्निशमन विभाग
महापालिका अंतर्गत खासगी रुग्णालयांची संख्या
रुग्णालयाचे नाव - खासगी रुग्णालयांची संख्या
आकुर्डी : ३५भाेसरी : १४४
जिजामाता : १३२सांगवी : ४४
तालेरा : ११६थेरगाव : ९५
यमुनानगर : ४५वायसीएम : १२
एकूण : ६२३