व्हाट्स अपच्या माध्यमातून ऑनलाईन जुगार; पिंपरी-चिंचवड पोलिसांची दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 18:15 IST2021-02-25T18:15:18+5:302021-02-25T18:15:31+5:30
मटका जुगार खेळण्याचे साहित्य, मोबाईल फोन, रोकड, असा एकूण १५ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त

व्हाट्स अपच्या माध्यमातून ऑनलाईन जुगार; पिंपरी-चिंचवड पोलिसांची दोघांना अटक
पिंपरी : व्हाट्सअपच्या माध्यमातून ऑनलाईन कल्याण मटका जुगार घेतल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून जुगाराचे १५ हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त केले आहे. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने बुधवारी (दि. २४) अशोकनगर, लिंक रोड, पिंपरी येथे ही कारवाई केली.
मटका चालक रवींद्र खुशालसिंग वाल्मिकी (वय ३१), मटका खेळी शेखर सरणदास वाल्मिकी (वय ४६, दोघे रा. अशोकनगर, लिंक रोड, पिंपरी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सहाय्यक फौजदार विजय कांबळे यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अशोकनगर येथे दोघेजण ऑनलाईन मटका खेळत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मटका जुगार खेळण्याचे साहित्य, मोबाईल फोन, रोकड, असा एकूण १५ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.