Pune Crime: परीक्षेत ‘मास्क’मध्ये डिव्हाईस बसवून केली 'हायटेक कॉपी'; पोलिसासह दोघांना बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 19:56 IST2021-12-22T19:47:03+5:302021-12-22T19:56:19+5:30
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस शिपाई पदाच्या ७२० जागांसाठी १९ नोव्हेंबरला लेखी परीक्षा झाली.

Pune Crime: परीक्षेत ‘मास्क’मध्ये डिव्हाईस बसवून केली 'हायटेक कॉपी'; पोलिसासह दोघांना बेड्या
पिंपरी : पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत ‘मास्क’मध्ये डिव्हाईस बसवून काॅपी करण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. यात खुद्द एका पोलिसाचाच सहभाग असल्याचे समोर आले असून हिंजवडी पोलिसांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला तसेच मास्कमध्ये डिव्हाईस लपवलेला परीक्षार्थी, अशा दोघांना बेड्या ठोकल्या. दोघांनाही सोमवारपर्यंत (दि. २७) पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पोलीस कर्मचारी राहुल उत्तम गायकवाड (वय ३३, रा. पोलीस वसाहत, औरंगाबाद), तर परीक्षार्थी गणेश रामभाऊ वैद्य (वय २५, रा. धोंदलगाव, ता. वैजापूर), असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी यापूर्वी नितीन जगन्नाथ मिसाळ (वय २६), रामेश्वर दादासाहेब शिंदे (वय २४, दोघे रा. औरंगाबाद) या दोघांना पोलिसांनी अटक केली होती.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस शिपाई पदाच्या ७२० जागांसाठी १९ नोव्हेंबरला लेखी परीक्षा झाली. यात हिंजवडी येथील परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी गणेश वैद्य याची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्याचा मास्क वजनदार वाटल्याने पोलिसांना संशय आला. त्यामुळे मास्कची तपासणी केली असता त्यात डिव्हाईस बसविल्याचे दिसून आले. याबाबत परीक्षार्थी वैद्य याच्याकडे विचारणा केली असता त्याने तेथून पळ काढला.
हिंजवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. आरोपी पोलीस कर्मचारी राहूल गायकवाड, नितीन मिसाळ आणि रामेश्वर शिंदे यांनी परीक्षार्थी आरोपी वैद्यला डिव्हाईस बनवून देण्यात मदत केली. यात पोलिसांनी सुरवातीला आरोपी मिसाळ आणि शिंदेला अटक केली. त्यानंतर पोलीस कर्मचारी राहूल गायकवाडचाही यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
मास्कमध्ये डिव्हाईस बसवून हायटेक काॅपी
बॅटरी, मॅग्नेट बार, ब्ल्यूटूथ आदी बसवून आरोपींनी इलेक्ट्राॅनिक डिव्हाईस तयार केले होते. ब्ल्यूटूथच्या माध्यमातून उत्तरे सांगून हायटेक काॅपी करण्याचा हा प्रकार आहे. आरोपी पोलीस कर्मचारी राहूल गायकवाड हा औरंगाबाद शहर पोलीस दलात कार्यरत आहे.