निवृत्त न्यायाधीशाची एक लाख ६८ हजारांची फसवणूक
By नारायण बडगुजर | Updated: March 16, 2023 18:07 IST2023-03-16T18:07:15+5:302023-03-16T18:07:27+5:30
कुरियरचा पत्ता चुकल्याचे सांगून लिंक पाठवून निवृत्त न्यायाधीशाला पैसे भरण्यास सांगितले होते

निवृत्त न्यायाधीशाची एक लाख ६८ हजारांची फसवणूक
पिंपरी : कुरियरचा पत्ता चुकला आहे, असे सांगून लिंक पाठवून निवृत्त न्यायाधीशाला पैसे भरण्यास सांगितले. त्यानंतर निवृत्त न्यायाधीशाच्या खात्यातून एक लाख ६७ हजार ९९७ रुपये काढून घेतले. बावधन खुर्द येथे ३ मार्च २०२३ रोजी हा फसवणुकीचा प्रकार घडला.
शिवाजीराव नारायणराव सरदेसाई (वय ७०, रा. बावधन खुर्द, पुणे) असे फसवणूक झालेल्या निवृत्त न्यायाधीशाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. १५) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात इसमाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवाजीराव सरदेसाई हे निवृत्त न्यायाधीश आहेत. त्यांचा किर्तीराज हा मुलगा यूएसए येथे राहण्यास आहे. किर्तीराज यांची मुलगी काव्या हिच्यासाठी फिर्यादी यांनी कपडे व मिठाई कुरियरने पाठविले होते. मात्र, कुरियरचा पत्ता चुकला आहे, असे अज्ञात व्यक्तीने फिर्यादीला सांगितले. पत्ता चुकल्याचे भासवून आरोपीने फिर्यादीला लिंक पाठवली. त्या लिंकवर पैसे भरा, असे सांगितले. त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या खात्यातून एक लाख ६७ हजार ९९७ रुपये काढून घेऊन फिर्यादीची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.