पिंपरी येथील वायसीएमच्या आयसीयू विभागात रूग्णांना नाही जागा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 19:05 IST2019-04-02T18:59:04+5:302019-04-02T19:05:57+5:30
महापालिकेच्या यंशवतराव चव्हाण रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात अर्थात आयसीयूमध्ये कधीही रूग्णास न्या, खाटा उपलब्ध नाहीत, असेच उत्तर तेथील डॉक्टरांकडून मिळते.

पिंपरी येथील वायसीएमच्या आयसीयू विभागात रूग्णांना नाही जागा
पिंपरी : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालया वायसीएम रूग्णालयात अतिदक्षता विभागात (आयसीयू) मध्ये रूग्णांसाठी खाटा उपलब्ध होत नाहीत. कधीतरी अपवादात्मक परिस्थितीत नव्हे तर हे विदारक वास्तव नित्याचेच झाले आहे. आयसीयूसाठी रूग्णाच्या खाटेचे बुकींग करून वायसीएममध्ये जागा उपलब्ध होईपर्यंत खासगी रूग्णालयातील आयसीयूमध्ये रूग्णांना दाखल करण्याची वेळ रूग्णांवर येत आहे. खासगी रूग्णालयाचा खर्च पेलविण्याची आर्थिक कुवत नसलेल्या गरीब, गरजू रूग्णांना या परिस्थितीमुळे उपचारापासून वंचित राहावे लागते आहे.
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात अर्थात आयसीयूमध्ये कधीही रूग्णास न्या, खाटा उपलब्ध नाहीत, असेच उत्तर तेथील डॉक्टरांकडून मिळते. खासगी रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करा, आपल्याकडे जागा उपलब्ध होताच, रूग्णा आणता येईल, असे वायसीएमचे डॉक्टर सांगतात. मंगळवारी दुपारी एकास हदयविकाराचा सौम्य झटका येऊन गेला. या रूग्णास वायसीएममध्ये नेले असता, आयसीयूमध्ये जागा नाही, असे सांगण्यात आले. रूग्णाची प्रकृती बिकट असतानाही त्याच्यावर सर्वसाधारण वॉर्डातच उपचार करण्यात आले. रात्री त्यास ऑक्सिजनची गरज भासली, त्यावेळी थोडावेळ त्यास अतिदक्षता विभागात नेऊन पुन्हा सर्वसाधारण वॉर्डात आणून ठेवले आहे. अद्याप त्याच्या कोणत्याही महत्वाच्या वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्या नाहीत, अहवाल प्राप्त झालेले नाहीत. वायसीएममध्ये एका आयसीयूमध्ये १५ तर दुसऱ्या ठिकाणी १८ खाटा आहेत. नव्याने २५ खाटांच्या आयसीयूचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. मात्र ते पूर्ण झालेले नाही. आयसीयू उपलब्ध नाही म्हणुन रूग्णांवर जीव गमावण्याची वेळ येऊ नये, याची महापालिका वैद्यकीय विभागाने दक्षता घेणे गरजेचे आहे. गरीब, गरजुंसाठीचे हे रूग्णालय त्यांच्यासाठी अत्यंत तातडीच्यावेळी उपयोगात आले नाही तर रूग्णालयाचा उपयोग काय? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.