पिंपरी : शहरातील विविध भागात गेल्या दोन महिन्यांत अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे महापालिकेने पुढील दीड महिना नवीन नळजोड न देण्याचा निर्णय घेतला आहे.
शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाख आहे. लोकसंख्या वाढत असतानाच पाणीपुरवठा फक्त ३५ टक्क्यांनी वाढला आहे. सद्यस्थितीत नागरिकांना ६४० एमएलडी पाणी देण्यात येत आहे. पवना, आंद्रा धरणात जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. गेल्या काही दिवसांपासून पाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे. शहरातील बोअरवेल आटले आहेत, सोसायट्यांमधील सांडपाणी यंत्रणा बंद आहेत. अनधिकृत नळ कनेक्शन वाढले आहेत. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विस्कळीत आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. संपूर्ण शहरातून विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे महापालिकेने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नळांना पंप लावून पाणी उपसा करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
नागरिकांनी या उपाययोजना कराव्यात
सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा सुस्थितीत ठेवावी, तेच पाणी उद्यानात ठिबक सिंचनद्वारे द्यावे, रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्था, पाण्याच्या टाक्यांची गळती तपासावी, सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा नसणाऱ्या जुन्या सोसायट्यांमध्ये ग्रे वॉटर प्लांट बसवावा. सोसायटीधारकांनी सोसायटीतील पाण्याचे ऑडिट करावे. अनधिकृत नळजोडणी व पाण्याच्या गैरवापराची माहिती महापालिकेला द्यावी.
पाणीपुरवठा विभागामार्फत होणार तपासणी
महापालिकेच्या नळांना पंप लावून पाणी उपसा करणाऱ्यांविरोधात कारवाई होणार, कारवाईनंतर पाणी खेचताना दिसल्यास नळ कनेक्शन बंद करणार, बांधकाम प्रकल्प, कार वॉशिंग सेंटर यांची तपासणी होणार आहे. सांडपाणी प्रक्रिया यंत्रणेच्या माध्यमातून निर्मित पाण्याचा वापर न करणाऱ्या मॉल व सोसायट्यांवर कारवाई होणार, पिण्याच्या पाण्याने गाडी व रस्ते धुणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
उन्हाळा असेपर्यंत आणि पावसाळा सुरू होईपर्यंत पाण्याचा जपून वापर करावा. अनधिकृत नळ कनेक्शन घेऊ नये. पाणीपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी पिण्याच्या पाण्याचा अपव्यय केल्यास कडक कारवाई केली जाणार आहे.- अजय सूर्यवंशी, सहशहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग