वडगाव मावळमध्ये हॉटेल व्यावसायिकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 13:25 IST2018-05-12T13:15:45+5:302018-05-12T13:25:41+5:30
वडगाव मावळ मधील सांगवी या गावातील तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने डोक्यावर वार करून अज्ञात व्यक्तीने खून केल्याची घटना घडली आहे.
_201707279.jpg)
वडगाव मावळमध्ये हॉटेल व्यावसायिकाचा खून
पिंपरी चिंचवड (वडगाव मावळ) : वडगाव मावळ मधील सांगवी या गावातील तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने डोक्यावर वार करून अज्ञात व्यक्तीने खून केल्याची घटना घडली आहे. वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील जुन्या भांडणाचा राग मनात धरून तसेच शेतीच्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे . मयताचे भाऊ सचिन प्रभाकर पगडे यांनी वडगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे . योगेश प्रभाकर पगडे (वय 32, रा. सांगवी, ता. मावळ, जि. पुणे) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश वडगाव भागात हॉटेल व्यवसाय करीत होते. आज (शनिवार, दि. 12) सकाळी सहाच्या सुमारास वडगाव-सांगवी रोडवर योगेश गंभीर जखमी अवस्थेत पडलेले आढळले. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. याबाबत वडगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाबा शिंदे अधिक तपास करीत आहेत.