Pimpri Chinchwad: पार्टीनंतर तोंडावर वीट मारून मित्राचा खून, आरोपीच्या मुसक्या आवळल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 13:25 IST2023-09-18T13:24:57+5:302023-09-18T13:25:44+5:30
रावेत पोलिसांनी कल्याण येथून घेतले ताब्यात...

Pimpri Chinchwad: पार्टीनंतर तोंडावर वीट मारून मित्राचा खून, आरोपीच्या मुसक्या आवळल्या
पिंपरी : मित्राचा खून करून पळालेल्या मजुराला रावेत पोलिसांनी कल्याण येथून अटक केली. किवळे येथील एका बांधकाम साइटवर ४ सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती.
विवेक गणेश पासवान (२४, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. दिनेश रामविलास यादव (२१, रा. उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. शिवकुमार घनश्याम प्रजापती (१९, रा. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पुणे - मुंबई महामार्गालगत किवळे येथे निर्माण माइल स्टोन ही बांधकाम साइट आहे. या साइटवर मयत विवेक पासवान, संशयित दिनेश यादव आणि फिर्यादी शिवकुमार प्रजापती यांच्यासह अन्य काहीजण फरशी बसविण्याचे काम करीत होते. त्यातील मयत विवेक हा इतर पाचजणांसह साइटवरील पत्र्याच्या खोलीमध्ये राहण्यास होता. त्याचा आणि त्याच्यासोबतच्या इतर मजुरांचा रविवारी पगार झाला. त्यामुळे मयत विवेक याने काही मजुरांसह पार्टी केली. त्यानंतर विवेक याच्या खोलीतील इतर चौघे मजूर झोपले असता विवेक आणि दिनेश यादव हे दोघेही पुन्हा मद्यपानासाठी गेले. मद्यपान करून आल्यानंतर त्यांच्यामध्ये किरकोळ भांडण झाले. यात दिनेश यादव याने विवेक पासवान याच्या तोंडावर सिमेंटची वीट मारली. यात गंभीर जखमी होऊन विवेक याचा मृत्यू झाला. त्यानंतर दिनेश यादव हा तेथून पळून गेला.
रावेत पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यामध्ये संशयित दिनेश हा मुंबईच्या दिशेने पळून गेल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी कल्याण येथील शिवाजी चौकातून आरोपीला ताब्यात घेतले.