महापालिकेचे कामकाज पेपरलेस; फाइल होणार इतिहासजमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 13:59 IST2025-01-08T13:58:21+5:302025-01-08T13:59:00+5:30
१५ जानेवारीपासून सुरुवात; प्रशासनाचे कामकाज पेपरलेस

महापालिकेचे कामकाज पेपरलेस; फाइल होणार इतिहासजमा
पिंपरी : ई-टपाल, डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टीमद्वारे कागदपत्रांचे व्यवस्थापन करणारी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेतील सर्व शासकीय अभिलेख व दस्तऐवज हा इलेक्ट्रॉनिक (संगणकीय) स्वरूपात जतन करण्यात येत आहे. त्यामुळे पेपरलेस कारभार, वेळेची बचत, प्रशासन हे गतिमान व पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. महापालिकेत १५ जानेवारीपासून सर्व विभागात ई-ऑफिस प्रणाली सुरू केली जाईल, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
महापालिकेच्या प्रशासनात पारदर्शकता व गतिमानता यावी, तसेच पेपरलेस कारभार होण्यासाठी ई-ऑफिस प्रणाली विकसित केली आहे. याकरिता स्मार्ट सिटी आणि महापालिकेकडून जीआयएस सक्षम ईआरपी प्रकल्पाद्वारे ३३ माॅड्युल तयार केले असून त्याद्वारे प्रशासनात ई-ऑफिस प्रणालीत कामकाज सुरू करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीकडून जीआयएस सक्षम ईआरपी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या प्रकल्पावर सुमारे ८३ कोटी रुपये खर्च केला आहे. या प्रकल्पांतर्गंत महापालिकेच्या ३५ विभागांचे दैनंदिन कामकाज ई-ऑफिस प्रणालीत सुरू करण्यात येत आहे. या प्रणालीने पालिकेचे सर्व विभागांचे कामकाज ऑनलाइन सुरू होत आहे.
अभिलेख, फाइल्सची निर्मिती होणार
नवीन प्रणालीची अंमलबजावणी करताना ती कार्यप्रणाली समजून घेण्याच्या उद्दिष्टाने सुरुवातीला अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. यामध्ये कागदपत्रांचे व्यवस्थापन करणारी प्रणाली (डीएमएस)चे प्रशिक्षण देण्यात आले. डीएमएस प्रणालीमध्ये नस्त्या तयार करताना प्रत्यक्ष तांत्रिक अडचणी, त्रुटी असल्यास तसे निरीक्षण विभाग प्रमुखांनी लेखी स्वरूपात प्रशासन विभागास कळविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. विभाग प्रमुखांनी नोंदविलेल्या निरीक्षणाची पूर्तता मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी यांच्यामार्फत होणार आहे.
स्मार्ट सिटी लिमिटेडअंतर्गत सुरू असलेला ‘जीआयएस सक्षम ईआरपी’ हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. महापालिका विभागांना जोडणारा ‘जीआयएस सक्षम एकात्मिक ईआरपी’ हा देशातील एकमेव प्रकल्प आहे. ज्या ठिकाणी महापालिकेचे सर्व विभाग भौगोलिक माहिती प्रणालीसोबत ‘इंटरप्रायजेस रिसोर्सेस प्लॅनिंग’द्वारे एकत्रित केले आहेत. तसेच, नागरिकांना कार्यक्षम आणि प्रभावीपणे सेवा प्रदान करण्यास मदत होणार आहे. - शेखर सिंह, आयुक्त- पिंपरी चिंचवड महापालिका.