महापालिकेचा सायकल ट्रॅक की अडथळ्यांची शर्यत?‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’ उपक्रमही पडला बंद

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: January 8, 2025 15:04 IST2025-01-08T14:59:23+5:302025-01-08T15:04:40+5:30

शहरात ४५ मीटर व त्यापेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांवर स्वतंत्रपणे सायकल ट्रॅक बनविले मात्र...

Municipal Corporation cycle track or obstacle course? 'Public Bicycle Sharing' initiative also closed | महापालिकेचा सायकल ट्रॅक की अडथळ्यांची शर्यत?‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’ उपक्रमही पडला बंद

महापालिकेचा सायकल ट्रॅक की अडथळ्यांची शर्यत?‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’ उपक्रमही पडला बंद

पिंपरी : महापालिकेतर्फे शहरात विविध रस्त्यांवर ७५ किलोमीटर अंतराचे ‘सायकल ट्रॅक’ तयार केले आहेत. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च झाला आहे. आणखी काही रस्त्यांवर ‘सायकल ट्रॅक’ बनविण्यात येणार आहेत. मात्र, हे ट्रॅक सुरक्षित आणि सलग नसल्याने सायकलस्वारांना मोठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. अनेकदा या मार्गावर सायकलस्वारांचे अपघात झाल्याचेही प्रसंग घडले आहेत.

शहरात ४५ मीटर व त्यापेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांवर स्वतंत्रपणे सायकल ट्रॅक बनविले आहेत. ज्या ठिकाणी कमी रुंदीचे रस्ते आहेत, तेथे लाल रंगाचे पट्टे तयार करून ‘सायकल ट्रॅक’ तयार करण्यात आले आहेत. शहरात विविध रस्त्यांवर एकूण ७५ किलोमीटर अंतराचे ‘सायकल ट्रॅक’ आहेत. हे ‘सायकल ट्रॅक’ महापालिका; तसेच ‘स्मार्ट सिटी’ कंपनीने केले आहेत.

असे आहेत अडथळे...

‘सायकल ट्रॅक’ एकसलग नसल्याने अडथळे निर्माण होत आहेत. सायकल ट्रॅकवर मध्येच झाड, बाके, कठडा, डीपी बॉक्स, दिव्याचा खांब, पार्क केलेले वाहन, विक्रेते, दुकानदारांचे साहित्य, राडारोडा, कचऱ्याचे ढीग, नामफलक, तुटलेले चेंबरचे झाकण, तुटलेले केबल, उघड्या वीजवाहक केबल, अतिक्रमण असे असंख्य अडथळे आहेत. त्यामुळे सायकलस्वारांना सुरक्षितपणे सायकल चालविता येत नाही. परिणामी, सायकल ट्रॅकसाठी केलेला कोट्यवधी खर्च पाण्यात गेल्याचे चित्र आहे. नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. त्यात अनेक लहान-मोठे अपघात होत आहेत. त्या कारणांमुळे ‘सायकल ट्रॅक’चा कोट्यवधीचा खर्च वाया गेल्याचे स्पष्ट होत आहे.

उपक्रम बंद पडला...

पिंपरी-चिंचवड ‘स्मार्ट सिटी लिमिटेड’च्या वतीने शहरातील २०० पेक्षा अधिक ठिकाणी ‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’ उपक्रम राबविण्यात आला. अनेक स्मार्ट सायकली चौका-चौकांत उपलब्ध करून देण्यात आल्या. ‘स्मार्ट मोबाइल’द्वारे तासाचे १० रुपये भाडे भरल्यानंतर त्या सायकली चालविण्याची सोय होती. मात्र, त्या उपक्रमास नागरिकांचा प्रतिसाद मिळाला नाही. काही सायकलीची तोडफोड करण्यात आली, तर काही सायकली चोरीस गेल्या. त्यामुळे तो उपक्रम काही महिन्यांतच गुंडाळण्यात आला. मेट्रो स्टेशनखालील सायकल स्टँडही गायब झाले आहे.

या मार्गावर स्वतंत्र ‘ट्रॅक’

- सांगवी फाटा ते साई चौक

- नाशिक फाटा ते वाकड

- काळेवाडी फाटा ते एम. एम. स्कूल

- चिंचवड गाव ते वाल्हेकरवाडी चौक

- केएसबी चौक ते कुदळवाडी

- एम्पायर इस्टेट ते ऑटो क्लस्टर चौक

- निगडी भक्ती-शक्ती चौक ते रावेत पूल

- पिंपळे सौदागर व पिंपळे गुरव

महापालिका कसेही बांधायचे म्हणून ‘सायकल ट्रॅक’ बांधत आहे. ‘ट्रॅक’वरील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केले जात आत आहे. महापालिकेने सुरक्षित व अतिक्रमणमुक्त ‘सायकल ट्रॅक’ बांधावेत. तर काही ठिकाणी फक्त सायकल ट्रॅकचे बोर्ड आहेत. मात्र, सायकल ट्रॅकच अस्तित्वात नाहीत. - अमोल कालेकर, सामाजिक कार्यकर्ते


नागरिकांनी पायी किंवा सायकलवर प्रवास करावा म्हणून महापालिका सुरक्षित असे ‘सायकल ट्रॅक’ व पादचारी मार्ग तयार करीत आहेत. ७५ किलोमीटर अंतराचे सायकल ट्रॅक बनविण्यात आले असून, अजून ५० किलोमीटर अंतराचे ‘सायकल ट्रॅक’ तयार करण्यात येणार आहेत. जवळच्या अंतरावर जाण्यासाठी नागरिकांनी सायकल वापरावी, यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. - बापूसाहेब गायकवाड, कार्यकारी अभियंता, वाहतूक नियोजन विभाग, महापालि

Web Title: Municipal Corporation cycle track or obstacle course? 'Public Bicycle Sharing' initiative also closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.