निगडीपर्यंत मेट्रोच्या मागणीसाठी विविध संघटनांचे आंदोलन, खासदार, आमदार, नगरसेवकांनी लावली हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2018 17:35 IST2018-02-11T17:33:59+5:302018-02-11T17:35:40+5:30
मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी, या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘कनेक्टिंग एनजीओ’अंतर्गत पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात रविवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

निगडीपर्यंत मेट्रोच्या मागणीसाठी विविध संघटनांचे आंदोलन, खासदार, आमदार, नगरसेवकांनी लावली हजेरी
पिंपरी - मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी, या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘कनेक्टिंग एनजीओ’अंतर्गत पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात रविवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणात शहरातील विविध सामाजिक संघटनांसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.
लाक्षणिक उपोषणात पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम (पीसीसीएफ), पोलीस नागरिक मित्र महाराष्ट्र राज्य, ग्राहक पंचायत पिंपरी-चिंचवड, जलदिंडी प्रतिष्ठान पुणे, आस्था सोशल फाउंडेशन, भावसार व्हिजन ‘इ’ पिंपरी-चिंचवड, रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी, स्वातंत्र्य वीर सावरकर मंडळ, एसबीआय पेन्शनर असोसिएशन, माउली ज्येष्ठ नागरिक संघ आकुर्डी, फेडरेशन आॅफ घरकुल, सस्कार प्रतिष्ठान पुणे, कै. तुकाराम तनपुरे प्रतिष्ठान आदी संघटनांनी सहभाग घेतला.
मावळ मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शेजला मोरे, नगरसेवक अमित गावडे, शिवसेनेचे पालिकेतील गटनेते राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेवक सचिन चिंचवडे, नगरसेवक राजू मिसाळ, नगरसेवक उत्तम केंदळे, नगरसेवक सचिन चिखले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेना पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख योगेश बाबर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश संघटक विशाल काळभोर, माजी नगरसेविका सुलभा उबाळे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, संजय लंके,अमोल भोईटे, सामाजिक कार्यकर्ते गुलाब सोनवणे आदींनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून पाठिंबा दिला.
पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत असावी, या मागणीसाठी पिंपरी-चिचंवड सिटीझन फोरमच्या सदस्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन वेळा भेट घेतली. मात्र मुख्यमंत्र्यांनी याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. पालकमंत्र्यांनी पहिल्या टप्प्यात पुणे मेट्रो निगडीपर्यंत जाणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले, त्यामुळे नागरिकांची मोठी निराशा झाली आहे. पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यासाठी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम (पीसीसीएफ) व अन्य संघटनांच्या वतीने मागील दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याने आणखी पाठपुरावा केला जाणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.