विधवा सुनेसाठी सासूच झाली 'आई', मुलाच्या निधनाचे दु:ख बाजूला ठेवत केला सुनेचा दुसरा विवाह

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 01:19 PM2023-01-28T13:19:46+5:302023-01-28T13:21:19+5:30

या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक...

Mother-in-law's initiative for remarriage of widowed daughter-in-law pune | विधवा सुनेसाठी सासूच झाली 'आई', मुलाच्या निधनाचे दु:ख बाजूला ठेवत केला सुनेचा दुसरा विवाह

विधवा सुनेसाठी सासूच झाली 'आई', मुलाच्या निधनाचे दु:ख बाजूला ठेवत केला सुनेचा दुसरा विवाह

googlenewsNext

- महादेव मासाळ

पिंपळे सौदागर (पुणे) : अवघ्या ३२ वर्षांच्या मुलाचे निधन झाल्यानंतर स्वत:चे दु:ख बाजूला ठेवून सुनेच्या भविष्याचा विचार करत सासूने मुलीप्रमाणे सांभाळ केलेल्या सुनेचा पुनर्विवाह केला. ही घटना आहे शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे येथील. पतीच्या निधनानंतर विधवा सुनेच्या पुनर्विवाहासाठी सासूनेच पुढाकार घेऊन वेगळा आदर्श निर्माण केला. सुनेचे समुपदेशन करून योग्य वरदेखील मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. छाया लायगुडे- काटे असे सुनेचा पुनर्विवाह करणाऱ्या आदर्श सासूचे नाव आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सासू- सुनेचे नातेदेखील प्रसंगी आई- मुलीच्या नात्यात रूपांतरित होऊ शकते. सर्वत्र भांडणे, कटकटी होत असतात. अशा घटनांना छेद देणारे प्रसंग समाजात घडत असतात. अशा परिस्थितीत सासूच आई बनून विधवा सुनेचे कन्यादान करते, हा क्षण खरोखरच स्तुत्य ठरत असतो. असाच एक विवाह सोहळा नुकताच पुण्यात झाला. सासूने सुनेचे कन्यादान करत आपल्या या कृतीतून आदर्श घालून दिला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील धायरी परिसरात राहणारे विशाल लायगुडे यांचा सहा वर्षांपूर्वी कावीळसदृश आजाराने मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात आई छाया, पत्नी रश्मी आणि पाच वर्षांची लहान मुलगी असा परिवार आहे.

विशाल यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. ऐन तारुण्यात मुलगा गमावल्याचे दु:ख असताना छाया यांना विधवा सुनेच्या भविष्याची चिंता लागली होती. पोटच्या मुलीप्रमाणे त्यांनी सून रश्मी हिचा सांभाळ केला. पुनर्विवाहासाठी तिचे मन वळविले. अखेर चार महिन्यांपूर्वी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पुण्यात रश्मी यांचा विवाह पार पडला.

आई म्हणून स्वीकारली जबाबदारी

पतीच्या निधनानंतर स्वत: विधवेचे दु:ख सोसले आहे. सुनेच्या भविष्याचा विचार केला. तिच्या वाट्याला दु:ख येऊ नये, या हेतूने मुलगा विशालचे निधन झाल्यानंतर सर्व नातेवाईकांच्या संमतीने तिच्या पुनर्विवाहाचा निर्णय घेतला व कन्यादान केले. या विवाहासाठी धाकटा मुलगा विपुल व धाकटी सून भाविका यांच्यासह अन्य नातेवाईक यांची साथ लाभली.

- छाया लायगुडे- काटे, सासू

Web Title: Mother-in-law's initiative for remarriage of widowed daughter-in-law pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.