पिंपरी : डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती देण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने तपासणी सुरू केली आहे. त्यात एकूण ६ लाख ७७ हजार २२२ घरांची तपासणी केली असून त्यापैकी ११ हजार ४९० ठिकाणी डास उत्पत्तीसाठी पोषक परिस्थिती आढळून आली आहे. डास उत्पत्ती ठिकाणांचा शोध घेऊन ती त्वरित नष्ट करणे, डासनाशक फवारणी करण्यात येत आहे. ते ३ हजार ७०६ ठिकाणी नोटीस बजावल्या. ८३३ नागरिक व आस्थापनांवर थेट कारवाई करून २९ लाख ८० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपायुक्त सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांमध्ये जनजागृती करण्यास प्राधान्य दिले जात आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने डेंग्यू व मलेरिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरभर धडक मोहीम सुरू केली आहे. औषध फवारणी, घरांची व कंटेनर तपासणी, भंगार दुकाने व बांधकाम स्थळांची पाहणी यासोबतच जनजागृती व दंडात्मक कारवाई सुरू आहे.
आठही प्रभागांत मिळून आलेली कारवाई सुरू आहे. एकूण ६ लाख ७७ हजार २२२ घरांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ११ हजार ४९० ठिकाणी डास उत्पत्तीसाठी पोषक परिस्थिती आढळून आली. तसेच ३६ लाख ४ हजार ७२१ कंटेनर तपासले असून, त्यातील १२ हजार ४४५ कंटेनरमध्ये डास वाढीसाठी पोषक वातावरण होते. एकूण १ हजार ४९५ भंगार दुकानांची तपासणी केली आहे. १ हजार ८१२ बांधकाम स्थळांची तपासणी करण्यात आली. यामध्ये साचलेले पाणी व अस्वच्छता निदर्शनास आली.
डेंग्यू आणि मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना सुरू आहेत. ज्या भागात डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत, त्या भागावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश आरोग्य आणि वैद्यकीय विभागांना दिले आहेत. डेंग्यू, मलेरियाच्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या जनजागृती मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा. - विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त
डेंग्यू व मलेरिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरभर धडक मोहीम सुरू केली आहे. नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे. - सचिन पवार, उपायुक्त