Mokka action against gangster Aniket Chaudhary and his gang | सराईत गुन्हेगार अनिकेत चौधरी टोळीवर मोक्काची कारवाई

सराईत गुन्हेगार अनिकेत चौधरी टोळीवर मोक्काची कारवाई

पिंपरी : सराईत गुन्हेगार अनिकेत चौधरी याच्या टोळीवर वाकड पोलिसांनी मोक्काची कारवाई केली. टोळीप्रमुख अनिकेत याच्यावर आॅक्टोबर २०१८ मध्ये पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एमपीडीएची कारवाई केली होती. एमपीडीए ची ही आयुक्तालयाची पहिली कारवाई होती. त्यानंतर अनिकेत चौधरी टोळीच्या १३ जणांवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.

अनिकेत अर्जुन चौधरी (वय २२, रा. थेरगाव), परशुराम उर्फ परश्या सुनील माने (वय २०, रा. वाकड), जुबेर युनूस खान (वय २०, रा. वाकड), अक्षय सिकंदर गंगावणे (वय २१, रा. वाकड), नाथा भीमराव शिंदे (वय २१, रा. वाकड), सुमित अतुल पंडित (वय २३, रा. थेरगाव), अभिजित दिलीप टेकाळे (वय १९, रा. थेरगाव), ओंकार नाना चंदनशिवे (वय १८, रा. थेरगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यांच्यासह त्यांच्या पाच साथीदारांवर कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत चौधरी हा टोळीप्रमुख आहे. त्याने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी गुन्हे केले आहेत. त्याच्यावर गर्दी मारामारी, दरोडा, दंगा, वाहनांची तोडफोड, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे सात गुन्हे आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पहिली एमपीडीए कारवाई अनिकेत चौधरी याच्यावर आॅक्टोबर २०१८ मध्ये करण्यात आली. त्यानंतर देखील त्याने थेरगाव परिसरात त्याच्या साथीदारांसह धारदार शस्त्र घेऊन दहशत निर्माण केली आहे. आरोपी सुमित याच्यावर सहा, परश्यावर तीन, जुबेर, अक्षय, अभिजित यांच्यावर दोन गुन्ह्यांची नोंद आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहिते, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांच्यामार्फत वाकड पोलिसांनी अनिकेत चौधरी टोळीवर मोक्काची कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवला. या प्रस्तावास अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी गुरुवारी (दि. १९) मान्यता दिली आहे. वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस हवालदार सुहास पाटोळे यांनी प्रस्ताव तयार केला. सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहिते याबाबत पुढील तपास करीत आहेत

Web Title: Mokka action against gangster Aniket Chaudhary and his gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.