हिंजवडीत ‘मेट्रोझिप’ बससेवा पुन्हा सुरू होणार; ट्रॅफिक कोंडीवर तोडगा

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: July 26, 2025 14:18 IST2025-07-26T14:17:44+5:302025-07-26T14:18:18+5:30

एचआयए, एमआयडीसी आणि आरटीओ यांचा संयुक्त पुढाकार; २०२० ला खंडित झालेली सेवा नव्याने सप्टेंबरपासून सेवा होणार सुरू

Metrozip bus service to resume in Hinjewadi; Solution to traffic congestion | हिंजवडीत ‘मेट्रोझिप’ बससेवा पुन्हा सुरू होणार; ट्रॅफिक कोंडीवर तोडगा

हिंजवडीत ‘मेट्रोझिप’ बससेवा पुन्हा सुरू होणार; ट्रॅफिक कोंडीवर तोडगा

पिंपरी : हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्क आणि परिसरातील वाहतूककोंडीला दिलासा देणारी ‘मेट्रोझिप’ ही खासगी बससेवा पुन्हा एकदा नव्याने सुरू होणार आहे. हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन (एचआयए), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) यांच्या संयुक्त पुढाकारातून हा उपक्रम सप्टेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे. सद्यःस्थितीत कोकोराईड्स (रुटमॅटिक) यांच्यासोबत करार झाला असून, अंतिम मंजुरी या महिन्याअखेर मिळणार आहे, अशी माहिती एचआयएच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

२०१३ मध्ये सुरू झालेली ही सेवा हिंजवडी परिसरातील हजारो कर्मचाऱ्यांसाठी एक वरदान ठरली होती. सुप्रीम ट्रॉन्सकन्सेप्ट्स, महिंद्रा लॉजिस्टिक्स, प्रसन्ना पर्पल, फॉर्ड ऑफिसराइड यांच्या माध्यमातून एकूण ११३ बसद्वारे दिवसाला तीन शिफ्टमध्ये ६ हजार कर्मचाऱ्यांचा प्रवास सुलभ केला जात होता. त्यामुळे केवळ कर्मचाऱ्यांना आरामदायी सेवा मिळाली नाही, तर हजारो खासगी वाहनांचा वापर कमी झाल्याने वाहतूककोंडीतही लक्षणीय प्रमाणात घट झाली होती.

कोविडमध्ये सेवा थांबली, आता नव्याने सुरू

मार्च २०२० मध्ये कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे मेट्रोझिप सेवा थांबवण्यात आली. त्यानंतर आयटी कंपन्यांमध्ये हायब्रिड आणि वर्क फ्रॉम होमचे प्रमाण वाढल्याने सेवा पुन्हा सुरू होऊ शकली नाही. परंतु, अलीकडे कर्मचाऱ्यांचे कार्यालयात नियमित उपस्थिती वाढल्याने या सेवेला नव्याने सुरुवात करण्यात येणार आहे.

कोकोराइड्स यांच्याशी करार

हिंजवडी इंडस्ट्रिज असोसिएशनने कोकोराइड्स या सेवाप्रदाता संस्थेशी करार केला आहे. सेवा सुरू होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, आरटीओ आणि एमआयडीसी यांच्याकडून अंतिम मंजुरी बाकी आहे. ती मंजुरी ऑगस्टमध्ये मिळण्याची शक्यता असून, त्यानंतर सप्टेंबरपासून प्रत्यक्ष सेवा सुरू होणार आहे.

वाहतूककोंडीवर उपाय

हिंजवडी परिसरात दररोज लाखो वाहनांची ये-जा होते. खासगी वाहनांवरील ताण आणि सार्वजनिक वाहतुकीचा अभाव असल्यामुळे येथे कायमच वाहतूककोंडी जाणवते. मेट्रोझिपसारख्या सामूहिक वाहतूक सेवा ही या समस्येवरील अत्यावश्यक गरज आहे. अधिकाधिक कंपन्या आणि कर्मचाऱ्यांनी या सेवेचा लाभ घेतल्यास रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होईल आणि प्रदूषणावरही नियंत्रण मिळेल, असा दावा करण्यात आला आहे.

 पोलिस आणि प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद

या उपक्रमासाठी एमआयडीसी, आरटीओ आणि पोलिस प्रशासन यांचे सहकार्य मोलाचे राहिले आहे. या यंत्रणांच्या समन्वयातूनच पूर्वी सेवा सुरळीत चालली होती आणि आता पुन्हा तीच ऊर्जा घेऊन मेट्रोझिप नव्याने कार्यान्वित होणार आहे. या सेवेमध्ये भविष्यात अधिक कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेण्याचा विचार असून, हिंजवडी परिसर ‘वाहतूककोंडी मुक्त’ करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. - कर्नल शंकर सालकर, व्यवस्थापकीय संचालक, हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन 

Web Title: Metrozip bus service to resume in Hinjewadi; Solution to traffic congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.