मेट्रोला पायघड्या पण एसटी नापास, स्थानकात खड्डे, कचरा, घाणीचा वास; वल्लभनगर आगारातील चित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 13:24 IST2024-01-19T13:20:58+5:302024-01-19T13:24:56+5:30

पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर एसटी आगार महत्त्वाचे स्थानक असून, येथे दररोज मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र येथून ३२७, तर मुंबईहून येणाऱ्या १८३ एसटी बसेस ये-जा करतात....

Metro steps but ST failed, potholes, garbage, smell of dirt in the station; Picture from Vallabhnagar Agar | मेट्रोला पायघड्या पण एसटी नापास, स्थानकात खड्डे, कचरा, घाणीचा वास; वल्लभनगर आगारातील चित्र

मेट्रोला पायघड्या पण एसटी नापास, स्थानकात खड्डे, कचरा, घाणीचा वास; वल्लभनगर आगारातील चित्र

- अविनाश ढगे

पिंपरी : बसस्थानकात सगळीकडे खड्डे, कचऱ्याचे ढीग, घाणीचे साम्राज्य, कळकटलेल्या आणि पिचकाऱ्यांनी रंगलेल्या भिंती, शिसारी आणणारे स्वच्छतागृह... अशी अवस्था एसटीच्या वल्लभनगर आगाराची झाली आहे. एकीकडे ‘स्मार्ट सिटी’त मेट्रो प्रकल्पावर कोट्यवधीचा चुराडा होत आहे, तर त्याच शहरात राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या बसस्थानकास मात्र सवतीची वागणूक मिळत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर एसटी आगार महत्त्वाचे स्थानक असून, येथे दररोज मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र येथून ३२७, तर मुंबईहून येणाऱ्या १८३ एसटी बसेस ये-जा करतात. पिंपरी-चिंचवड आगाराच्याही तीस बसेस येथून सुटतात. दररोज हजारो प्रवासी चढउतार करतात. पण, स्थानकात प्रवाशांसाठी प्राथमिक सुविधाही नाहीत.

आगारात प्रवेश करताच ‘स्मार्ट सिटी’तील तापदायक रस्त्यांचे दर्शन होते. आगारातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे आगारात बस घेऊन जाताना चालकांना आणि खासगी वाहन घेऊन जाताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते. स्थानकात दोन मोठ्या पाणपोई आहेत. पण, त्यातील नळ गायब आहेत. नळच नाहीतर पाणी येणार कुठून? या स्थानकात पिण्यासाठी पाण्याची सुविधाही नाही.

खानपानासाठी कॅन्टीन आहे. पण, ते अस्वच्छ असल्यामुळे तेथे जाण्याची इच्छाही होत नाही. हिरकणी कक्ष कायम बंद असतो. स्थानकातील शौचालय अस्वच्छ, खराब असून, त्याची दुर्गंधी दूरवर पसरली आहे. बसस्थानकाच्या सर्व भिंती कळकटलेल्या असून, त्या मावा-गुटखा-पान खावून पिचकाऱ्यांनी रंगवल्या आहेत. चालक आणि वाहकांसाठी असलेल्या विश्रांतीच्या खोल्यांमध्ये कचऱ्याचे ढीग, डासांचा वावर असतो. तीही जागा कमी पडत असल्यामुळे चालक-वाहकांना जमिनीवर झोपावे लागत आहे.

मेट्रोचे स्थानक चकचकीत; पण...

पिंपरी चिंचवडची स्मार्ट सिटी म्हणून ओळख आहे. शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध प्रकल्पांवर कोट्यवधीचा खर्च होत आहे. मेट्रो प्रकल्पाला पायघड्या घातल्या जात आहेत. मेट्रोला जागा देऊन चकचकीत स्थानके उभारली जात आहेत. पण, सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी असलेल्या एसटीच्या बसस्थानकाकडे दुर्लक्ष झाले आहे. विशेष म्हणजे या आगाराच्या समोरच असलेले मेट्रोचे चकचकीत स्थानक ही विदारक स्थिती स्पष्ट करत आहे.

आगारप्रमुखांची उडवाउडवीची उत्तरे

वल्लभनगर एसटी आगारातील समस्यांबाबत आगारप्रमुख संजय वाळवे यांना विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देतात. बहुसंख्यवेळा ‘मिटिंग’मध्ये असल्याचे सांगून फोनवर बोलण्याचे टाळतात.

हे कसले सर्वेक्षण, हा कसला दर्जा?

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर एसटी स्थानक’ अभियानांतर्गत सुरू असलेल्या सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड आगाराला ६६ गुण देऊन ‘चांगला’ दर्जा देण्यात आला आहे. आगारात सुविधांची वानवा असूनही चांगला दर्जा दिला गेल्याने सर्वेक्षणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

दररोज अशी होते बसेसची ये-जा

मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातून ३२७

मुंबईहून येणाऱ्या १८३

पिंपरी-चिंचवड आगार ३०

Web Title: Metro steps but ST failed, potholes, garbage, smell of dirt in the station; Picture from Vallabhnagar Agar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.