'भुजबळ उभे राहुद्यात मग बघतो', मनोज जरांगे पाटलांचे आक्रमक विधान
By विश्वास मोरे | Updated: April 7, 2024 17:44 IST2024-04-07T17:43:36+5:302024-04-07T17:44:44+5:30
आम्हाला सरकारने न्याय द्यावा, सरकार अन्याय करत राहील तर येणारी विधानसभा निवडणूका लढवणार

'भुजबळ उभे राहुद्यात मग बघतो', मनोज जरांगे पाटलांचे आक्रमक विधान
पिंपरी: नाशिक लोकसभेतून मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी दिल्यानंतर तुमची रणनीती काय असेल? या प्रश्नावर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले, जाऊ द्या त्यांचा नका विचार करू. ते उभे राहुद्यात मग बघतो.' असे विधान रविवारी देहूगाव येथे केले.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आज पुणे आणि पिंपरी चिंचवड दौऱ्यावर होते. त्यांनी दुपारी देहूगाव येथील संत तुकाराम महाराज मंदिरास भेट दिली. तुकोबारायांचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. लोकसभानिवडणूक रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यामुळे जरांगे पाटील राजकीय काय बोलणार? याबाबत उत्सुकता होती. नाशिक लोकसभेतून मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी दिल्यानंतर तुमची रणनीती काय असेल? असा प्रश्न माध्यमांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना विचारला. त्यावर एका वाक्यात उत्तर दिले. ""जाऊ द्या त्यांचा नका विचार करू. ते उभे राहुद्यात मग बघतो.' असे विधान केले.
तुकोबारायांकडे काय मागितले
जरांगे पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीसंदर्भात मी भूमिका जाहीर केली आहे. आज तुकोबारायांच्या आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. सगे सोयरे यांचा आदेशाची अंलबजावणी केली जावी. आम्हाला सरकारने न्याय द्यावा. सरकार अन्याय करत राहील तर येणारी विधानसभा निवडणूका लढवणार आहे. या संदर्भातील भूमिका जाहीर केली जाईल. ''