लोकमत इम्पॅक्ट! अखेर वायसीएम रुग्णालयात रेबीज प्रतिबंधक लस उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 23:34 IST2018-11-15T23:34:02+5:302018-11-15T23:34:27+5:30
महापालिका : औषध भांडारात वीस लसींचा साठा

लोकमत इम्पॅक्ट! अखेर वायसीएम रुग्णालयात रेबीज प्रतिबंधक लस उपलब्ध
पिंपरी : गेल्या महिन्यामध्ये महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये रेबीज प्रतिबंधक लसीचा तुटवडा जाणवू लागला होता. वेळेमध्ये लस उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णांना ऐनवेळी पर्याय शोधावा लागत होता. या संदर्भात लोकमतने ‘शहरात औषधांची टंचाई’ या मथळ्याखाली ६ नोव्हेंबर रोजी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत वायसीएममध्ये रेबीज प्रतिबंधक लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिली असल्याची माहिती औषध भांडार विभागाने दिली आहे.
श्वानदंशावरील लस उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना ऐनवेळी धावपळ करावी लागत होती. तसेच महापालिकेच्या रुग्णालयांमधून आपापसात लस वाटून घेतली जात होती. त्यामुळे काही वेळेस लस रुग्णालयात येईपर्यंत रुग्णांना वाट पाहावी लागत होती. सद्य:स्थितीमध्ये वायसीएमच्या औषध भांडारामध्ये रेबीज प्रतिबंधक २० लस शिल्लक आहेत, तर काही लस तातडीक विभागामध्ये ठेवण्यात आल्या आहेत. वायसीएम रुग्णालयात रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. तसेच शहराबरोबरच राज्यातील कानाकोपऱ्यातूनही रुग्ण उपचारासाठी येत असतात. मागील काही दिवसांपासून शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव पुन्हा वाढला आहे. श्वानदंशाच्या अनेक घटना घडल्या असून, लशीअभावी रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती. मात्र, आता लस उपलब्ध झाल्याने संबंधित रुग्णांची गैरसोय टळणार आहे.