लोकमत न्यूज नेटवर्करहाटणी : येथे मागील अनेक दिवसांपासून साई लक्झरीय सोसायटीच्या समोरील रस्ता खोदण्यात आला. मात्र, खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने येथे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत़ रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. पावसाच्या अगोदर शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविणे, पालिका प्रशासनाची प्रमुख जबाबदारी आहे. मात्र, तसे होताना दिसून येत नाही. गोडांबे कॉर्नर ते तापकीर मळा चौक या रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्ता खोदला आहे पण, पुन्हा त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. हा डांबरी रस्ता आहे. त्यामुळे वाहने वाहनचालक जोरात चालवीत असतात. मात्र, अचानक रस्त्यावर खड्डा दिसल्याने ब्रेक लावला जाऊन अनेक वाहनचालक वाहन घसरून पडून जखमी होत आहेत. या रस्त्यावर नगरसेविकेच्या घराकडे वळण्याच्या ठिकाणीच सुमारे दोन फूट रुंदीचा ३० फूट लांबीचा रस्ता खोदण्यात आला आहे. हा खड्डा वाहनचालकांना सहजा- सहजी दिसून येत नाही. या ठिकाणी दिवसातून लहान मोठे अपघाताचे सत्र सुरूच आहे. याला जबाबदार कोण हा रस्ता ज्या कामासाठी ज्यांनी खोदला त्यांच्यावर पालिका प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे. जर रस्ता खोदण्याची परवानगी पालिका देते तर रस्ता दुरुस्तीची जबाबदारी कोणाची? जर या अपघातात एखाद्याचा प्राण गेला, तर याला जबाबदार कोण? असा सवाल वाहनचालक उपस्थित करीत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. वाल्हेकरवाडी-रावेत मार्गावर ठेकेदाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे रस्त्यालगत राडारोडा पडल्याने गैरसोय होत आहे. रस्त्यावर राडारोडा ठेवणाऱ्या ठेकेदारांकडून महापालिकेने शुल्क आकारावे. रस्त्यावरील राडारोडा लवकरात लवकर उचलवा, अशी मागणी होत आहे. प्रशासन मात्र मूग गिळून गप्प का आहे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. सदर रस्ता अत्यंत छोटा आहे. या मार्गावर सतत वाहनांची गर्दी असते. त्यामुळे अपघात घडले आहेत. रस्ता छोटा, त्यातच राडारोडा रस्त्यावर टाकल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी अपघात होऊन दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला होता.
रहाटणीतील रस्त्यावर अपघाताला निमंत्रण
By admin | Updated: June 10, 2017 02:04 IST