बँकांच्या नावाखाली फसवणुकीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 23:54 IST2018-11-12T23:54:21+5:302018-11-12T23:54:45+5:30
संवादाच्या जाळ्यात फसवून भामटे हवी ती माहिती मिळवतात व त्या खात्यावरील रक्कम क्षणात काढून घेतात.

बँकांच्या नावाखाली फसवणुकीत वाढ
मोशी : बँकेचा अधिकारी असल्याचे भासवून क्रेडिट कार्डची माहिती घेऊन लाखोंचा गंडा घातला जात असल्याच्या प्रकारात शहरात वाढ झाली असून, अशा भामट्यांकडून मध्यमवर्गीय कुटुंबातील खातेदारांना लक्ष केले जात आहे.
संवादाच्या जाळ्यात फसवून भामटे हवी ती माहिती मिळवतात व त्या खात्यावरील रक्कम क्षणात काढून घेतात. किंवा आॅनलाइन महाग वस्तू खरेदी करतात. यामुळे सामान्यांच्या कष्टाची कमाई अशी क्षणात हस्तांतरीत होत असून, शहरातही अशा प्रकारात वाढ होताना दिसून येत आहे. शक्यतो अशा प्रकारच्या घटना मध्यमवर्गीयांमध्ये जास्त घडत असून, बँकिंग साक्षरतेचा अभाव असल्यामुळे काही ग्राहक याला बळी पडताना दिसतात. जी सुज्ञ आणि सुशिक्षित तरुण असतात ती अशा कॉशलेसला उत्तरे देत नाहीत. भामट्यांकडून एटीएमची माहिती घेऊन आॅनलाइन महागड्या वस्तू खरेदी केल्या जातात व त्याच वस्तू कमी किमतीत विकल्या जातात. जादातर असा गुन्हा करणारे गुन्हेगारही तरुण असून, शिक्षणाचा उपयोग गुन्हा करण्यासाठी वापरण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. असा गुन्हा करण्यासाठी वापरण्यात येणारे सीम हे चोरी केलेली कागदपत्रे देऊन खरेदी करण्यात येत असल्याने पोलीस यंत्रणेलाही
खरे गुन्हेगार पकडणे अवघड जाते. या गुन्ह्यांवर निर्बंध आणणे अवघड असून, सतर्कता हाच या पासूनचा उपाय आहे.
संपर्क साधून बँक अधिकारी असल्याचे भासवले जाते. एटीएम कार्डवरची माहिती विचारली जाते. यामध्ये कार्ड नंबर, सीवी नंबर, समाप्ती डेट, कार्डवरचे नाव व पासवर्ड विचारला जातो. सदर माहिती मिळवताच हे भामटे आँनलाइन शॉपिंग किंवा बनावट कार्ड बनवून खात्यातील रक्कम लंपास करतात. त्यानंतर ज्या नंबरवरून संपर्क साधण्यात आला होता ते सीम कायमचे बंद करण्यात येते.