मी आवाज नाही स्वर लावते : देवकी पंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 03:00 IST2018-12-15T03:00:36+5:302018-12-15T03:00:59+5:30
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये ख्यातनाम कलाकारांबरोबरचा संवादात्मक कार्यक्रम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘अंतरंग’ या कार्यक्रमामध्ये महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आरती अंकलीकर यांनी देवकी पंडित यांची मुलाखत घेतली.

मी आवाज नाही स्वर लावते : देवकी पंडित
पुणे : चुकीच्या आणि रियाजाच्या अतिताणामुळे माझा आवाज गेला वर्षभर बोलू शकले नाही. गळा गाता करण्यासाठी दोन वर्षे लागली. माझा आवाज कुठला आणि तो कसा गेला, हे मला आत्मचिंतनातून उमजले, अशा अनुभवी बोलातून प्रसिद्ध गायिका देवकी पंडित यांनी सुराला सूर लावला म्हणजे स्वर जुळला असे होत नाही. मी आवाज नाही पण स्वर लावते याकडे लक्ष वेधले.
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये ख्यातनाम कलाकारांबरोबरचा संवादात्मक कार्यक्रम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘अंतरंग’ या कार्यक्रमामध्ये महोत्सवाच्या तिसºया दिवशी आरती अंकलीकर या देवकी पंडित यांची मुलाखत घेणार होत्या; पण प्रत्यक्षात दोघींनी एकमेकांशी गप्पाच मारत श्रोत्यांना सुरेल शब्द मैफिलीचा अनुभव दिला. शिवाजीनगर येथील सवाई गंधर्व स्मारकामध्ये सकाळी झालेल्या या कार्यक्रमाला आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, गायक आनंद भाटे उपस्थित होते. लहानपणापासून मैत्रिणी असलेल्या, या दोन्हीही गायिका अगोदर पंडित वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे आणि पुढे किशोरीताई आमोणकर यांच्याकडे शिकल्या. एकमेकींच्या फिरक्या घेत, पंडित वसंतराव कुलकर्णी आणि किशोरीताई यांच्यासह माणिक वर्मा यांचा साधेपणा, पं. जितेंद्र अभिषेकी, बबनराव हळदणकर, मोगुबाई कुर्डीकर, वीणाताई सहस्रबुद्धे, आशा भासले, लता मंगेशकर आणि पंडित भीमसेन जोशी अशा अनेक महान गायकांच्या आठवणी दोघींनी उलगडून दाखवल्या. देवकी घरी थालीपीठ खायला येणार असल्याने इथे यायला उशीर झाला असे सुरूवातीलाच आरती अंकलीकर यांनी मिश्किलपणे सांगताच ‘उशीर झाला की माझ्यावर ढकलायचं ही तुझी नेहमीची सवय आहे, अशा लडिवाळ स्वरात देवकी पंडित यांनी प्रत्युत्तर दिले. या वेळी ‘षड्ज’ या कार्यक्रमात ‘जमुना के तीर’ हा अब्दुल करीम खॉँ यांच्यावरील लघुपट दाखविण्यात आला.
गायकीचा स्वभावाशी संबंध असतो. राग म्हणून विचार मांडतो. हळुवारपणे उलगडणं म्हणजे गाणं सूर, बंदिश, वादी-संवादी नाही तर त्यापलीकडे जाऊन आपण यमन होणं म्हणजे गाणं असतं. त्यासाठी रियाज, गाणं आहे हे किशोरीताईंनी सांगितले. ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. मी बुवांच्या अंगाखांद्यावर खेळले आहे ‘ही माझी मुलगी आणि शौनक दुसरा’, असेच ते सगळ्यांना सांगायचे. मला परत त्यांनी गाण्यात आणलं. गुरूंनी जे शिकवले ते जपून ठेव असे त्यांनी सांगितले.
- देवकी पंडित
किशोरीताई म्हणजे गाणे देणाºया गुरू आहेत. किशोरीतार्इंनी जयपूर घराण्याचे गाणे पचवून त्यातील भावतत्व घेऊन स्वत:चे गाणे, स्वत:चे घराणे निर्माण केले. त्यांचे गाणे आता तीन पिढ्या गायले जात आहे. त्यांनी राग व्हायला आणि दुस-यांनाही राग करायला शिकवले. शरीर, मन, मेंदू, आत्मा यांचा विलक्षण संगम म्हणजे किशोरीताई यांचे गाणे.
- आरती अंकलीकर