कुदळवाडीची कारवाई कशी केली? खासदार अमोल कोल्हे यांनी आयुक्तांकडे मागितला अहवाल
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: March 4, 2025 20:00 IST2025-03-04T19:59:37+5:302025-03-04T20:00:28+5:30
या कारवाईमुळे भंगार गोदांमांसह इतर अनेक उद्योजक अडचणीत

कुदळवाडीची कारवाई कशी केली? खासदार अमोल कोल्हे यांनी आयुक्तांकडे मागितला अहवाल
पिंपरी : चिखली आणि कुदळवाडी भागातील अनधिकृत बांधकामांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोठी कारवाई केली. यावरून कारवाईची प्रक्रिया, करवसुली, तसेच कारवाईमुळे उद्ध्वस्त झालेल्या पाचशे लघुउद्योगांचे पुढे काय केले, असे प्रश्न उपस्थित करीत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महापालिका आयुक्तांकडून अहवाल मागितला आहे.
महापालिकेने कुदळवाडीत धडक कारवाई करत सात दिवसांत ८२५ एकर जागेवरील अनधिकृत भंगार गुदामे, लघुउद्योग व इतर आस्थापना भुईसपाट केल्या. या कारवाईमुळे भंगार गोदांमांसह इतर अनेक उद्योजक अडचणीत आले. रोजगार हिरावल्याने अनेकजण रस्त्यावर आले. महापालिकेच्या या कारवाईवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लघुउद्योजक व उद्योजकांच्या संघटनांनी या कारवाईवरून महापालिका व सरकारच्या धोरणावर टीका केली. आता खासदार कोल्हे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून सविस्तर अहवालाची मागणी केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, महापालिकेने चिखली आणि कुदळवाडी परिसरात २०२५ पर्यंत किती लोकांकडून कर गोळा केला? बांधकामे अनधिकृत होती, तर त्यांच्याकडून कर का वसूल केला? ग्रामपंचायतीपासून वास्तव्य व व्यवसाय असलेल्या लोकांकडे सातबारा, फेरफार व इतर कागदपत्रे होती का? ग्रामपंचायतीतून महापालिकेत आलेल्या आणि कर गोळा केलेल्या बांधकामांना अनधिकृत का घोषित केले? या भागात अनधिकृत बांधकामांवर यापूर्वी किती वेळा व कोणती कारवाई केली? त्यांना कितीवेळा नोटिसा दिल्या गेल्या? कर संकलन करताना संबंधित आस्थापनांना पूर्वसूचना दिली होती का, या प्रश्नांच्या आधारे माहिती उपलब्ध करून द्यावी. माहिती देण्यास दुर्लक्ष केले जात असून पुन्हा दुर्लक्ष केल्यास संसदेत हा मुद्दा मांडू
कारवाईनंतर टीपी स्कीम राबविण्याची चर्चा
चिखली, कुदळवाडीत झालेल्या कारवाई महापालिका प्रशासनाच्या चुकीमुळे या भागात पाचशेवर लघुउद्योग उद्ध्वस्त झाले असतील, तर त्यांची नुकसानभरपाई देण्यात येणार आहे का, या भागात नवीन टीपी स्कीम प्रस्तावित असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबतही सविस्तर खुलासा करावा, असे कोल्हे यांनी म्हटले आहे.