वडमुखवाडीत हॉटेल कामगाराचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 02:14 IST2018-12-08T02:14:07+5:302018-12-08T02:14:15+5:30
हॉटेलमध्ये काम करणाऱ्या दोन कामगारांनी त्यांच्यासोबतच काम करणा-या एकाचा खून केला.

वडमुखवाडीत हॉटेल कामगाराचा खून
पिंपरी : हॉटेलमध्ये काम करणाऱ्या दोन कामगारांनी त्यांच्यासोबतच काम करणा-या एकाचा खून केला. ही घटना च-होली, वडमुखवाडी येथे शुक्रवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास उघडकीस आली. ज्ञानेश्वर अंकुश गवळी (वय २१, रा. नानाश्री हॉटेल वडमुखवाडी, मूळ जालना) असे खून केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अनिकेत मानसिंग राजपूत (वय २३, रा. नानाश्री हॉटेल वडमुखवाडी, मूळ सोलापूर) याच्यासह आणखी एकावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शेखर बाळासाहेब दिंडे (वय ३२, रा. वडमुखवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वडमुखवाडी येथे असलेल्या नानाश्री हॉटेलात गवळी व आरोपी कामाला होते. गुरुवारी रात्री गवळी व आरोपी यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले. यामुळे रागाच्या भरात एकाने गवळी यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रेताची विल्हेवाट लावण्याच्या हेतूने शीर धडापासून वेगळे केले. सकाळी दिंडे हे हॉटेल उघडण्यासाठी आले असता गवळी यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत त्यांनी तातडीने दिघी पोलिसांना माहिती दिली. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून, त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.