पिंपरी : हिंजवडी ते शिवाजीनगर या महत्त्वाच्या मेट्रो मार्गाला आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. मार्च २०२५ पर्यंत मेट्रो धावण्याचे उद्दिष्ट संबंधित ठेकेदाराला पूर्ण करण्यात आले नाही. हे काम आता ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. २३ किलोमीटरच्या या मार्गावर आणखी काही स्थानकांचे काम बाकी असल्याने मुदतवाढ मिळणार आहे.
पुणे प्रादेशिक क्षेत्रीय विकास प्राधिकरण यांच्याकडे हा प्रकल्प आहे. पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) या तत्त्वावर या प्रकल्पाचे काम सुरू आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या या कामाला जुलैनंतर गती मिळाली होती. मात्र, प्रत्यक्षात मेट्रोची डेडलाइन पाळण्यामध्ये संबंधित ठेकेदार अपयशी ठरला. हिंजवडी (माण, मेगा पोलिस) ते शिवाजीनगर पुण्यातील तिसरा मोठा मार्ग आहे. संपूर्ण मार्ग १८ ते २० मीटर उभ्या केलेल्या खांबांवर आहे. त्याचप्रमाणे पुणे-बंगळूर महामार्ग आणि मुळा नदीवर उभारण्यात आला आहे. या एकूण प्रकल्पासाठी ८३१३ कोटी रुपये खर्च होणार आहेत.
या कामाला नोव्हेंबर २०२१ मध्ये सुरुवात झाली. मात्र, मार्च २०२५ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे मुदतवाढ मिळणार आहे. या मार्गावरील काही स्थानकांचे काम अपूर्ण असून, शिवाजीनगर (आरबीआय) आणि औंध येथील कामे संथ आहेत.
सद्य:स्थितीत ७९ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामध्ये पिलर उभारण्याचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे २३ स्थानकांपैकी १२ स्थानकांची कामे पूर्ण झाली असून, इतर स्थानकांची कामे अपूर्ण आहेत. विविध ठिकाणी जिन्याचे आणि अकरा स्थानकांचे महत्त्वाचे काम बाकी आहे. यामध्ये प्रामुख्याने इंटरकनेक्ट काम असल्याने विद्यापीठ चौकात कामाची गती कमी आहे. रस्त्यावरील एचटी लाइनमुळेही अडथळा निर्माण झाला आहे.सप्टेंबरपर्यंत तरी मेट्रो धावणार का?
मेट्रोचा हा मार्ग पुढील सहा महिन्यांत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यानंतर ट्रायल रन आणि काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रो प्रवासी वाहतुकीसाठी खुली करण्यात येईल. मात्र ही कामे सहा महिन्यांत पूर्ण होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्रकल्पाचे काम मुदतीत पूर्ण होणार नाही. त्यामुळे मुदतवाढ दिली आहे. करारानुसार संबंधित कंपनीला दंड आकारण्यात येणार आहे. त्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. - डाॅ. योगेश म्हसे, महानगर आयुक्त, पीएमआरडीए