हिंजवडी पोलिसांचा हुक्का पार्लरवर छापा; हॉटेल मालक, व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 14:57 IST2024-02-21T14:57:18+5:302024-02-21T14:57:48+5:30
हॉटेलचा मालक आणि व्यवस्थापक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

हिंजवडी पोलिसांचा हुक्का पार्लरवर छापा; हॉटेल मालक, व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल
पिंपरी : भुगाव रोड, बावधन येथे एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर हिंजवडीपोलिसांनी कारवाई केली. हॉटेलचा मालक आणि व्यवस्थापक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. १९) करण्यात आली.
व्यवस्थापक प्रवीण अमृतलाल गौतम (वय १९, रा. भूगाव, ता. मुळशी), मालक समीर श्रीधर शेट्टी (४१, रा. वारजे, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस अंमलदार रवी पवार यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन येथील टिप्सी टर्टल बार आणि रेस्टॉरंटमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. आरोपींनी प्रतिबंधित तंबाखूजन्य हुक्का ग्राहकांना पिण्यासाठी उपलब्ध करून दिला. हिंजवडी पोलिसांनी छापा टाकून ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. हॉटेलचा मालक आणि व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.