पिंपरी - चार जणांच्या टोळक्याने पिंपरी रेल्वे स्थानकावर एका तरुणाला धरून ठेवले. त्याला दमदाटी केली. त्याच्याकडून कुटुंबीयांचा मोबाइल क्रमांक घेतला. त्याच्या वडिलांना मोबाइलवरून संपर्क साधला. तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे़ ताबडतोब रेल्वे स्थानकावर तीन हजार रुपये घेऊन या, असे सांगितले. तरुणाचे वडील धावपळ करीत रेल्वे स्थानकावर आले़ अपहरणकर्त्यांना तीन हजार रुपये दिले. तीन हजर रुपये रोख तसेच घड्याळ, मोबाइल जबरदस्तीन हिसकावून टोळके पसार झाले. याबाबतची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली, परंतु तत्पूर्वी लुबाडणूक करून अपहरणकर्ते पसार झाले होते. पोलिसांनी अज्ञात अपहरणकर्त्यांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिव मनोज मिश्रा (वय १८) हा आकुर्डी येथून कासारवाडीला जाण्यासाठी पुण्याकडे जाणाºया रेल्वेगाडीत बसला. लोकलच्या डब्यातील तीन ते चार तरुण त्याच्याकडे आले. ‘‘तू आमच्या बहिणीला का छेडतोस? अशी विचारणा करून ते वाद घालू लागले. शाब्दिक वाद घालत त्यांनी शिव मिश्राला पिंपरी रेल्वे स्थानकावर उतरवले. रेल्वे स्थानकावर उतरताच, त्यांनी त्यास घोळका घातला. त्याच्या जवळील मोबाइल, घड्याळ जबरदस्तीने काढून घेतले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी शिवकडून त्याच्या वडिलांचा मोबाइल क्रमांक घेतला. त्यांच्याशी संपर्क साधून तातडीने तीन हजार रुपये घेऊन रेल्वे स्थानकावर येण्यास सांगितले. मुलाचे अपहरण केलेल्या आरोपींनी पैशांची मागणी करताच, शिवचे वडील घाईघाईत पिंपरी रेल्वे स्थानकात आले. टोळक्याकडे त्यांनी तीन हजार रुपयांची रक्कम सोपवली. रेल्वे स्थानकावर काहीतरी गोंधळ सुरू आहे, हे लक्षात येताच प्रवाशांनी याबाबत रेल्वे पोलिसांना कळविले. मात्र शिवच्या वडिलांकडून अपेक्षित रक्कम मिळाली असल्याने टोळक्याने तेथून लगेच पळ काढला. अपहरण करून तुटपुंजी रक्कम मागणारे हे आरोपी भुरटे चोर असावेत, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. शिवाय तीन हजार रुपयांच्या मागणीसाठी तरुणाच्या वडिलांना मोबाइल करण्याचे अपहरणकर्त्यांनी धाडस दाखविले, याचा अर्थ त्यांना शिव शर्मा यांची कौंटुबिक पार्श्वभूमी माहिती असावी, मिश्रा कुटुंबीयांची माहिती असणारे, त्यांची ओळख असणाºयांपैकी कोणाचे तरी हे कृत्य असावे, असा पोलिसांना संशय आहे. पिंपरी रेल्वे स्थानकावरून लहान मुलांचे अपहरण होण्याच्या दोन घटना मागील काही वर्षांत घडल्या आहेत.
तीन हजार रुपयांसाठी पिंपरीत रंगले अपहरणनाट्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2017 19:04 IST