चारित्र्याच्या संशयावरून प्रेयसीची गळा आवळून हत्या, आरोपीला सोलापूरमधून अटक
By प्रकाश गायकर | Updated: September 14, 2024 21:56 IST2024-09-14T21:55:35+5:302024-09-14T21:56:10+5:30
विनायक अनिल आवळे (वय ३५, रा. काळेवाडी) असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे.

चारित्र्याच्या संशयावरून प्रेयसीची गळा आवळून हत्या, आरोपीला सोलापूरमधून अटक
पिंपरी : चारित्र्याच्या संशयावरुन प्रेयसीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पळून गेलेल्या आरोपी प्रियकरास सोलापूरमधून पोलिसांनी अटक केली. वाकड पोलिसांनी ही कामगिरी केली. शिवानी सोमनाथ सुपेकर (वय २८) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. विनायक अनिल आवळे (वय ३५, रा. काळेवाडी) असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे.
पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास जगतापनगर, थेरगाव येथे रिक्षामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी महिलेची ओळख पटवली. ती महिला रिक्षा चालक विनायक याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे समजले. घटनेनंतर तिचा प्रियकर विनायक हा पळून गेल्याचे निष्पन्न झाले. विनायक याचा शोध घेण्यासाठी वाकड पोलिसांनी दोन पथके तयार केली. विनायक हा विजापुर, कर्नाटक येथे पळून गेल्याची माहिती प्राप्त झाली. तो विजापुर येथून परत सोलापूरच्या दिशेने प्रवास करत असताना तपास पथकाने पाठलाग करुन त्यास सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले. विनायक याला शिवानी यांच्या चारित्र्यावर संशय आल्याने त्याच्या राहत्या घरामध्ये गळा आवळून खून केल्याची कबुली त्याने दिली.
ही कामगिरी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशीकांत महानवर, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त विशाल गायकवाड, सहायक आयुक्त सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, गोरख कुंभार, सहायक निरीक्षक अर्जुन पवार, उपनिरीक्षक सचिन चव्हाण, अनिरुध्द सावर्डे, विभीषण कन्हेरकर यांनी केली.
आरोपी सराईत गुन्हेगार
आरोपी विनायक आवळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर २०१३ मध्ये पुणे रेल्वे स्टेशनमध्ये चोरीचा, २०१६ मध्ये भोसरी पोलिस ठाण्यात खुनी हल्ल्याचा, २०१९ मध्ये भोसरी पोलिस ठाण्यात बेकायदा शस्त्र बाळगल्याचा, २०२० मध्ये पिंपरी पोलिस ठाण्यात मारहाण केल्याचा आणि २०२४ मध्ये वाकड पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे.