पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी चिखलीत चार हेक्टर जागा; वाहन व मनुष्यबळाचीही समस्या सोडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 10:17 PM2021-07-17T22:17:02+5:302021-07-17T22:17:18+5:30

वाढणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना

Four hectare land in Chikhali for Pimpri-Chinchwad Police Commissioner office | पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी चिखलीत चार हेक्टर जागा; वाहन व मनुष्यबळाचीही समस्या सोडविणार

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी चिखलीत चार हेक्टर जागा; वाहन व मनुष्यबळाचीही समस्या सोडविणार

googlenewsNext

पिंपरी : पालकमंत्र्यांनी चिखली येथे चार हेक्टर जागा देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेली आहे. त्या जागेवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी सर्व सुविधांनीयुक्त इमारत उभारण्यात येईल. तसेच वाहन व मनुष्यबळाचा प्रश्न सोडविण्यासाठी कार्यवाही केली जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

वळसे पाटील यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालाला शनिवारी दुपारी भेट देत आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. पोलीस महासंचालक संजय पांडेय, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे उपस्थित होते. 

वळसे पाटील म्हणाले, राज्यात पहिल्या टप्प्यात होणाऱ्या भरतीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी ७२० पदे भरली जाणार आहेत. तसेच झालेल्या बैठकीत पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला. त्याबाबत अहवाल तयार करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच वाढणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत असलेल्या मावळ तालुक्यातील वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण या पोलीस ठाण्यांचा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत समावेश करण्यात यावा, असा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. मात्र त्याबाबत अद्याप काही माहिती नाही, असे वळसे पाटील यांनी या वेळी सांगितले. 

जनता दरबार घेण्याच्या सूचना
पोलीस ठाणे स्तरावर दर महिन्याला जनता दरबार घेण्यात यावा. त्याबाबत नागरिकांना माहिती द्यावी. त्यांच्याकडून त्यांच्या समस्या जाणून घेत कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना वळसे पाटील यांनी या वेळी केली. सोशल मीडियावर वॉच ठेवून पोलिसांनी कार्यवाही करावी. तसेच सायबर क्राईम रोखण्यासाठीही उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. 

प्रॉपर्टी सेल होणार कार्यान्वित
शहरात जमिनीशी संबंधित वादाचे प्रकार वाढतच आहेत. लॅण्ड माफियांवर वचक बसविणे आवश्यक आहे. त्याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. जमिनी संदर्भातील प्रकरण हाताळण्यासाठी पोलीस आयुक्तालयांतर्गत प्राॅपर्टी सेलची आवश्यकता असल्याचेही ‘लोकमत’ने नमूद केले होते. त्यानुसार प्रॉपर्टी सेलची स्थापना करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Four hectare land in Chikhali for Pimpri-Chinchwad Police Commissioner office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.